बेस्ट मालामाल, प्रवासी घामाघूम; ‘आयपीएल’साठी ५०० बस आरक्षित 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 09:51 AM2024-04-13T09:51:37+5:302024-04-13T09:52:42+5:30

अपुऱ्या बसमुळे प्रवासी ताटकळले.

increasing of earning in best 500 buses reserved for ipl passengers are complaining that they have to wait for the bus in the in sun as it runs 20 to 25 minutes late | बेस्ट मालामाल, प्रवासी घामाघूम; ‘आयपीएल’साठी ५०० बस आरक्षित 

बेस्ट मालामाल, प्रवासी घामाघूम; ‘आयपीएल’साठी ५०० बस आरक्षित 

मुंबई :मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यावेळी विशेष मुलांना स्टेडियमवर आणण्यासाठी ‘एज्युकेशन ॲण्ड स्पोर्ट्स ऑफ ऑल’ या संस्थेने बेस्टच्या ५०० बस आरक्षित केल्या होत्या. यामुळे बेस्टला ६० ते ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले खरे, मात्र दुसरीकडे दैनंदिन बस प्रवाशांना याचाच फटका सहन करावा लागला. अनेक मार्गांवरच्या बस २० ते २५ मिनिटे उशिरा धावल्यामुळे प्रवाशांना कडक उन्हात ताटकळत बसची प्रतीक्षा करावी लागल्याची तक्रार प्रवासी करत आहेत.

‘एज्युकेशन ॲण्ड स्पोर्ट्स ऑफ ऑल’ने जवळपास १८ हजार मुलांना आयपीएल सामना पाहता यावा, यासाठी वातानुकूलित, विना वातानुकूलित, दुमजली, अशा ५०० बस घेतल्या होत्या. आधीच ताफ्यात बेस्टच्या बस कमी आहेत. उपक्रमाने बस ताफा वाढवण्याचा संकल्प केला असला तरी ते उद्दीष्ट साध्य झालेले नाही. जुन्या बस भंगारात काढल्यामुळे बसची संख्याही कमी होऊ लागली आहे. त्यामुळे आधीच बस फेऱ्यांची संख्या घटली आहे. बससाठी बस थांब्यावर प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागू लागत आहेत. 

बऱ्याच वेळाने येणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यातच गुरुवारी ५०० बसचा तुटवडा जाणवल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. यामुळे सामान्य प्रवाशांसह अनेक संघटनांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. प्रवाशांच्या सहनशक्तीचा उद्रेक झाल्यास त्याला बेस्ट उपक्रम जबाबदार असेल, अशा प्रतिक्रिया संघटनेने दिली आहे.

बेस्टला किती महसूल मिळणार?

एका बससाठी प्रति किमी अंतर आणि बस उभी करण्याचा कालावधी मोजून साधारणपणे १२ ते १८ हजार रुपये आरक्षित रक्कम भरावी लागते. मुंबईत झालेल्या आयपीएलच्या सामन्यामुळे बेस्टला ६० ते ८० लाख रुपयांदरम्यान महसूल मिळाल्याचा अंदाज आहे.

सेवाभावी संस्थेकडून विशेष मुलांसाठी ही बससेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. भविष्यात आयपीएलच्या सामन्यासाठी अद्याप तरी पुन्हा असे नियोजन नाही. - अनिल डिग्गीकर, महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम

बेस्ट प्रशासन किमान बस आपल्या ताफ्यात ठेवण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे प्रवाशांना बस थांब्यांवर २० ते ४० मिनिटे गाड्यांची वाट पाहात ताटकळत उभे राहावे लागत आहे. फक्त महसूल मिळावा म्हणून, आयपीएलसारख्या स्पर्धेकरिता ५०० बसगाड्या उपलब्ध करून देणे म्हणजे प्रवाशांची क्रूर चेष्टा आहे. गुरुवारी ईदची सुटी होती म्हणून ठीक, बाकीच्या कामाच्या दिवशी बेस्टने असा प्रकार केला तर काय होईल?
- रुपेश शेलटकर, आपली बेस्ट आपल्याचसाठी संस्था

Web Title: increasing of earning in best 500 buses reserved for ipl passengers are complaining that they have to wait for the bus in the in sun as it runs 20 to 25 minutes late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.