Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात मूत्रपिंड विकारांच्या रुग्णांत वाढ; डायलिसिस किंवा प्रत्यारोपण हाच पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 06:36 IST

दरवर्षी क्रॉनिक किडनी विकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

मुंबई :  गेल्या काही वर्षांत राज्यात मूत्रपिंड (किडनी) विकारांच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात किडनीचे विकार होण्याचा धोका असतो. आधुनिक जीवनशैलीमुळे हे विकार बळावत चालले आहे. त्यामुळे या आजारांना प्रतिबंध कसा घालता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. राज्यात क्रॉनिक किडनी विकारांत वाढ होत असल्याचे मत मूत्रपिंडविकारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार दरवर्षी क्रॉनिक किडनी विकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे काय ? 

क्रॉनिक किडनी डिसीजला किडनी फेल्युअर असेही म्हणतात. या आजारात किडनी पूर्णतः निकामी होते आणि रक्तशुद्धी योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. विविध विषारी घटकांचे शरीरातील प्रमाण वाढते. 

रुग्णाला आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. रक्तातील सीरम क्रिएटिनीनची पातळी वाढते. यामुळे किडनीचे आरोग्य संकटात आले. रुग्णाला डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपणाचा पर्याय सुचविला जातो.   

सर्वसाधारण लक्षणे लघवीतून रक्त येणे वजन कमी होणे चेहऱ्यावर, पायावर सूज येणेथकवा, निद्रानाश, डोकेदुखी त्वचेला खाज येणे 

शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्याचे काम मूत्रपिंड करते. त्यामुळे ते निरोगी असणे आवश्यक असते. मूत्रपिंड रक्तदाब नियंत्रित ठेवते.

दरवर्षी दोन लाख रुग्ण 

आपल्याकडे ठोस आकडेवारी नसली तरी दरवर्षी किडनी विकाराच्या दोन लाख नव्या रुग्णांची नोंद होते. परिणामी डायलिसिस सेंटरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मिठाचे अतिरिक्त सेवन हे किडनीच्या आरोग्यासाठी घातक आहे. आधुनिक जीवनशैलीचा त्याग करून संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. मात्र किडनीचे आजार होऊच नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण आता तरुणांमध्येही किडनी विकार उद्भवू लागले आहेत - डॉ. श्रीरंग बिच्चू, मूत्रपिंड विकारतज्ज्ञ, बॉम्बे हॉस्पिटल  

टॅग्स :महाराष्ट्रआरोग्य