राज्यात ६ महिन्यांत अपघातांत वाढ, मृत्यूचे प्रमाण घटले; प्राणघातक अपघातांची संख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 08:34 IST2025-07-28T08:34:14+5:302025-07-28T08:34:55+5:30

राज्य वाहतूक विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.

increase in accidents in the state in 6 months death rate decreases number of fatal accidents increases | राज्यात ६ महिन्यांत अपघातांत वाढ, मृत्यूचे प्रमाण घटले; प्राणघातक अपघातांची संख्या वाढली

राज्यात ६ महिन्यांत अपघातांत वाढ, मृत्यूचे प्रमाण घटले; प्राणघातक अपघातांची संख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात विविध सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करूनही जानेवारी ते जून या कालावधीत रस्त्यांवरील प्राणघातक अपघातांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत २१ ने वाढली आहे. एकूण अपघात आणि अपघाती मृत्यूंमध्ये मात्र किरकोळ घट नोंदवण्यात आली आहे. राज्य वाहतूक विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.

रस्ते अपघातात महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो. राज्यात चार कोटींहून अधिक नोंदणीकृत वाहने आहेत. रस्त्यांवर दरवर्षी ३५ हजारांहून अधिक अपघात होत असून, त्यांत १५ हजारांपेक्षा जास्त मृत्यूंची नोंद होते. रस्ते आणि महामार्ग वाढल्याने रस्तेसुरक्षेच्या दृष्टीने आव्हान निर्माण झाले आहे. परिवहन विभाग, वाहतूक पोलिसही फारसे गंभीर नसल्याने ८० टक्क्यांपेक्षा जास्त वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात आणि त्यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे बोलले जात आहे. भारतातील ४० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या मोठ्या शहरांमध्ये राहते. त्यामुळे शहरी रस्ते अधिक सुरक्षित असणे गरजेचे आहे.

अपघातांची कारणे

वेगाने वाहन चालवणे, चालकांकडून उत्तेजक पदार्थांचे सेवन, हेल्मेटचा वापर न करणे, सीटबेल्ट न लावणे, वाहन चालवताना मोबाइल फोन वापरणे, असुरक्षित रस्ते, पायाभूत सुविधांचा अभाव, अपघातानंतरची अपुरी काळजी आणि वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष अशी रस्ते अपघातांची प्रमुख कारणे आहेत. इतर कारणांमध्ये रस्ते अभियांत्रिकीतील कमतरता, खड्डे, जुनी वाहने आणि ओव्हरलोडिंग यांचा समावेश होतो. तथापि, शहरी किवा निमशहरी रस्त्यांवर उलट दिशेने वाहन चालवणे हे अपघातांचे दुसरे सर्वांत मोठे कारण आहे.

राज्यातील रस्ते अपघात

वर्ष    एकूण अपघात    मृत्यू    जखमी
२०१९    ११,७८७    १२,७८८    १९,१५२
२०२०    १०,७३३    ११,५६९    १३,९७१
२०२१    १,२५५    १३,५२८    १६,०७३
२०२२    १४,०५८    १५,२२४    १९,५४०
२०२३    १४,११९    १५,३६६    २१,४४६
२०२४    १४,५६५    १५,७१५    २२,०५१

जानेवारी-जूनदरम्यानच्या अपघाताची आकडेवारी

वर्ष    अपघात    मृत्यू    गंभीर जखमी    एकूण अपघात
२०२४    ७,६७४    ८,३०२    ११,३०८    १८,८५६
२०२५    ७,६९५    ८,२७६    १२,०६८    १८,८२६

 

Web Title: increase in accidents in the state in 6 months death rate decreases number of fatal accidents increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात