बेस्टच्या बसभाडयात 1 ते 12 रुपयांपर्यंत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 20:24 IST2018-03-03T20:24:57+5:302018-03-03T20:24:57+5:30
आर्थिक मदत मिळण्यासाठी महापालिकेच्या अटीनुसार तयार करण्यात आलेल्या बेस्ट बचाव कृती आराखड्यासह बस भाडेवाढीलाही पालिका महासभेत आज मंजुरी मिळाली.

बेस्टच्या बसभाडयात 1 ते 12 रुपयांपर्यंत वाढ
मुंबई - आर्थिक मदत मिळण्यासाठी महापालिकेच्या अटीनुसार तयार करण्यात आलेल्या बेस्ट बचाव कृती आराखड्यासह बस भाडेवाढीलाही पालिका महासभेत आज मंजुरी मिळाली. त्यानुसार पहिल्या चार किलो मीटर पर्यंत बस भाड्यात कोणतीही वाढ नाही. त्यानंतर सहा ते ३० किलो मीटरपर्यंत एक ते १२ रुपये अशी भाडेवाढ असणार आहे. तसेच बसपास दरात वाढ, बस ताफ्याचे पुनर्नियोजनाच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर ही भाडेवाढ तात्काळ लागू होणार आहे.
आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्रमाने पालक संस्था असलेल्या महापालिकेला मदतीचे साकडे घातले होते. मात्र बेस्टने काटकसरीच्या उपाययोजना केल्यास मदत देण्यात येईल अशी अट महापालिका प्रशासनाने घातली. त्यानुसार कामगारांचे भत्ते गोठवणे, बस भाड्यात वाढ, अनेक योजना बंद करण्याची शिफारस या कृती आराखड्यात करण्यात आली होती. या आराखड्याची अंमलबजावणी केल्यास ५०४ कोटी १८ लाख रुपये बचत होईल असा दावा बेस्टने प्रशासनाने केला आहे. परंतु बेस्ट भाडेवाढला विरोधी पक्षाची तर कामगारांच्या संबंधित शिफारशीत कामगार संघटनांचा विरोध होता.
मात्र पालिका महासभेत हा कृती आराखडा तातडीचे कामकाज म्हणून सादर करण्यात आला. अचानक हा प्रस्ताव मंजुरीसाठी आल्याने विरोधक बेसावध राहिले. त्यामुळे बेस्टमधील सुधारणेच्या प्रस्तावासह बस भाडेवाढही मंजूर झाली आहे. महासभेची मंजुरी मिळाल्यामुळे बेस्ट प्रशासन आता बस भाडेवाढीचा प्रस्ताव प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाकडे पाठवणार आहे. तिथे मंजुरी मिळाल्यास तात्काळ ही भाडेवाढ लागू होणार आहे. मात्र कामगारांशी संबंधित अनेक शिफारशीवर वाद सुरु असल्याने हा मुद्दा तूर्तास मागे ठेवण्यात आला आहे.