अल्पवयीन मुलीचे भररस्त्यात घेतले ‘चुंबन’; तरुणाला ४ वर्षे कारावास, २०१४ मधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 07:04 IST2021-11-07T07:03:55+5:302021-11-07T07:04:51+5:30
गोरेगावमध्ये २०१४ मध्ये हा प्रकार घडला होता.

अल्पवयीन मुलीचे भररस्त्यात घेतले ‘चुंबन’; तरुणाला ४ वर्षे कारावास, २०१४ मधील घटना
मुंबई : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला भररस्त्यात अडवत ‘चुंबन’ घेणाऱ्या २५ वर्षांच्या तरुणाला चांगलेच भोवले आहे. या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता, सत्र न्यायालयाने त्याला चार वर्षांचा कारावास आणि दंड ठोठावला आहे.
गोरेगावमध्ये २०१४ मध्ये हा प्रकार घडला होता. यातील आरोपीचे महाविद्यालयात शिकणाऱ्या १७ वर्षांच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. ती गोरेगावमधील बसस्थानकावर संध्याकाळी ७ च्या सुमारास मैत्रिणीसोबत उभी होती. त्यावेळी त्याने तिला अडवत तिचा हात धरला आणि तिच्या ओठांवर चुंबन घेतले. ज्यामुळे ती चांगलीच घाबरली आणि त्याला धक्का देत घटनास्थळाहून पसार झाली. याप्रकरणी तिने तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला शिक्षा ठोठावत लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना एक मेसेज देण्याचा प्रयत्नही न्यायालयाने केला आहे.