Join us
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीचे अश्लील व्हिडीओ काढून आईला पाठवले; तरुणाविरोधात आझाद मैदान पोलिसात गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 13:50 IST

याप्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई : कुटुंबीयांच्या विरोधामुळे मैत्रिणीने बोलणे सोडल्याच्या रागातून एका तरुणाने तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो ‘स्नॅपचॅट’वरून मैत्रिणीच्या आई आणि काकांना पाठविल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मूळची कर्नाटकची रहिवासी असलेली ही २० वर्षीय  तरुणी सध्या मरीन लाइन्स परिसरात नातेवाइकांसोबत राहते. कर्नाटकमध्ये तिची तोहिफ शरीफ (२२) नावाच्या तरुणासोबत मैत्री झाली. तोहिफ सोबतच्या  मैत्रीला तिच्या आई - वडिलांचा विरोध असल्याने त्यांनी या तरुणीला पुढील शिक्षणासाठी मुंबईतील नातेवाइकांकडे पाठवले. ही तरुणी  मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेण्याबरोबरच हवाई सुंदरी बनण्याचे प्रशिक्षणसुद्धा घेत आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात या दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. तोहिफने त्याचे व्हिडीओही तयार करून ठेवले होते. त्यानंतर १९ जूनला पीडित तरुणी अंधेरी येथून घरी जात असताना शरीफ तेथे आला आणि त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण केली. 

कर्नाटकमध्येही तक्रार-

या घटनेनंतर तरुणीने नातेवाइकांना बोलावून एन. नगर पोलीस ठाण्यात शरीफविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला. यावेळी पीडित मुलीच्या वडिलांनी कर्नाटकमधील पोलीस ठाण्यातही तक्रार दिली.  

विवाहाचा वाद समजताच कृत्य-

१) तरुणीच्या विवाहावरून घरात वाद सुरू झाले होते. हे समजल्यानंतर शरीफने शनिवारी दोघांच्या शारीरिक संबंधांचे काढलेले व्हिडीओ आणि फोटो ‘स्नॅपचॅट’वरून तरुणीच्या आई आणि काकांना पाठविले. 

२) अखेर तरुणीने आझाद मैदान पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस