मुंबईत ५०० मीटरच्या पुढचे डोळ्यांना दिसेना; धुरक्यामुळे दृश्यमानता झाली कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 08:50 IST2026-01-07T08:49:34+5:302026-01-07T08:50:02+5:30
हवेच्या गुणवत्तेचा दर्जा मध्यम, शहरभरातील बांधकामांमुळे प्रदुषणात होतेय वाढ

मुंबईत ५०० मीटरच्या पुढचे डोळ्यांना दिसेना; धुरक्यामुळे दृश्यमानता झाली कमी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईसोबत पूर्व व पश्चिम उपनगरातील बहुतांश ठिकाणच्या बांधकामांमुळे नवीन वर्षातही प्रदूषणात होणारी वाढ कायम आहे. धुरके पसरल्यामुळे मुंबईत दृश्यमानता कमी झाली असून ५०० मीटरच्या पुढचे दिसत नसल्याची स्थिती मंगळवारी होती. महाबळेश्वर, माथेरान प्रमाणे मुंबईतही तीन दिवस धुके नोंदविले गेले. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा मध्यम नोंदविण्यात येत आहे. हवेचा दर्जा घसरल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईकरांना खोकला आणि इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी देखील मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा मध्यम नोंदविण्यात आला. हवा धोकादायक नोंदविली गेल्यास बांधकामे बंद करण्यासोबत उर्वरित कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून देण्यात आली.
हे प्रत्यक्षात धुके
मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसापासून मुंबईत प्रदूषण वाढल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात हे धुके आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीत थंडीत धुके दिसून येते.
हवामानातील बदलामुळे दृश्यमानता कमी झाली असली तरी मुंबईच्या हवेचा गुणवत्तेचा दर्जा हा मध्यम स्वरूपाचा नोंदविला जात आहे. हवा धोकादायक नोंदविली गेल्यास त्या भागातील नियम मोडणारे बांधकाम थांबविले जाते. सध्या तरी त्याची आवश्यकता भासलेली नाही.
मुंबईसारख्या महानगरासाठी संबंधित गुणवत्ता नोंद काही प्रमाणात दिलासादायक असली तरी, ‘मध्यम’ हवेच्या दिवसांची संख्या लक्षात घेता प्रदूषण नियंत्रणासाठी सातत्याने उपाययोजना करण्याची गरज आहे. - सुनील दहिया, पर्यावरणाचे अभ्यासक
प्रदूषणकारी ४ आरएमसी प्लांट बंद, १.८९ कोटींचा दंड वसूल
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाने प्रदूषणकारी चार आरएमसी प्लांट बंद केले आहेत. तर, १ कोटी ८९ लाखांचा दंड वसूल केला आहे. उच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रातील अशा प्लांटच्या तपासणीसाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली होती.
तुर्भे, नवी मुंबई येथील दीपक स्टोन कंपनी, क्रिस्टल काँक्रीट इन्फ्रा, सलोनी कन्स्ट्रक्शन व भिवंडी येथील फॉम रॉक एलएलपी हे ४ आरएमसी प्लांट बंद करण्यात आले आहेत. ५९ प्लांटला प्रस्तावित निर्देश तर, ३४ प्लांटसाठी मंडळाकडून अंतरिम निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई शहरातील २४, कल्याण येथील १, नवी मुंबई येथील १० असे ३५ प्लांट तपासणीअंती पर्यावरण विषयक सूचनांचे पालन करीत नसल्याचे दिसले.
मोहिमेवर दृष्टिक्षेप
डिसेंबर महिन्यापासून आजपर्यंत एकूण १९६ आरएमसी प्लांटची तपासणी करून आतापर्यंत ३.५९ कोटी दंड वसूल केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाने मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रातील आरएमसी प्लांट तपासणीसाठी धडक मोहीम हाती घेतली असून, पर्यावरणविषयक नियमांचे अनुपालन न करणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाई केली जात आहे.
भरारी पथकांच्या माध्यमांतून हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी मंडळ सर्वोपरी प्रयत्न करीत असून, याकरिता गरज पडल्यास अतिरिक्त भरारी पथके स्थापन केली जातील, असे मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सांगितले.