मांजरींना नेण्याचा बहाणा करत, महिलेवर बलात्काराचा प्रयत्न! केअरटेकरला अटक
By गौरी टेंबकर | Updated: July 19, 2024 17:22 IST2024-07-19T17:21:00+5:302024-07-19T17:22:30+5:30
मालवणी पोलिसांनी बिहार मधुन आवळल्या मुसक्या.

मांजरींना नेण्याचा बहाणा करत, महिलेवर बलात्काराचा प्रयत्न! केअरटेकरला अटक
गौरी टेंबकर, मुंबई : एका ब्रँड मॅनेजमेंट आणि बिझनेस डेव्हलपमेंट कंपनीच्या ३८ वर्षीय महिला अधिकाऱ्याला मांजरी न्यायला बोलावत बलात्काराचा अयशस्वी प्रयत्न करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी बिहारमधून आरोपीचा गाशा गुंडाळला आहे.
आरोपी प्रकाशकुमार मांझी (२८) हा मालाड पश्चिम येथील मढच्या व्यासवाडी परिसरात असलेल्या बंगला-कम-फिल्म प्रॉडक्शन हाऊसमध्ये केअरटेकर-कम-वॉचमन म्हणून काम करत होता. तर पीडित महिला ही शेजारच्या दुस-या बंगल्यात राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी आरोपीने महिलेला सांगितले की तिच्या तीन मांजरी त्याच्या बंगला-कम-प्रॉडक्शन हाऊसमध्ये आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही त्या मांजरी घेऊन जा. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा ती महिला तिच्या मांजरीना घेण्यासाठी बंगल्यात गेली तेव्हा आरोपीने तिला पकडले आणि तिच्याकडून शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र महिलेने त्याला विरोध केल्याने त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिला बंगल्यातील एका खोलीत नेले. ती त्याला सतत विरोध करत असल्याने तिच्यावर त्याने चाकूने हल्ला केला. ज्यात तिच्या मानेवर, पोटावर गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर आरोपीने महिलेला प्रोडक्शन हाऊसच्या खोलीत बंद करून पळ काढला. महिलेने जवळच राहणाऱ्या त्याच्या मित्राशी संपर्क साधला. तो तातडीने तिच्या मदतीसाठी धावून आला व तिला कोकिलाबेन रुग्णालयात नेले.
पोलिसांचे एक पथक रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी तिचा जबाब नोंदवला. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चीमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमर शिंदे आणि पथकाने तपास सुरू केला. त्यानंतर बिहारमधून मांझी याच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता २२ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले. त्याच्यावर बीएनएस कायद्याचे कलम ६२,६४,७४,७५,१०९,११८,१२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्या असून यापूर्वी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.