...अखेर पाऊस परतला; मुंबईकर सुखावले, शहर आणि उपनगरात पावसाची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 09:25 IST2024-06-29T09:23:35+5:302024-06-29T09:25:40+5:30
जूनच्या सुरुवातीला दोन दिवस वर्षाव केल्यानंतर जवळपास महिनाभर पावसाने ओढ दिली.

...अखेर पाऊस परतला; मुंबईकर सुखावले, शहर आणि उपनगरात पावसाची हजेरी
मुंबई : जूनच्या सुरुवातीला दोन दिवस वर्षाव केल्यानंतर जवळपास महिनाभर पावसाने ओढ दिली. आता मात्र महिना सरत असताना पावसाचे पुनरागमन झाले आहे. गुरुवारी सकाळपासून मुंबईत पावसाने मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे गेला महिनाभर लागलेला उकाडा कमी झाला असून गारव्यामुळे मुंबईकर सुखावले आहेत.
मुंबईत सलग दोन दिवस चांगला पाऊस होत आहे. त्याचा वाहतुकीवर तसेच उपनगरीय रेल्वेसेवेवरही मोठा परिणाम झाला नाही. वाहतूकही सुरळीत होती. पाणी साचण्याचे प्रकारही फार घडले नाहीत. शुक्रवारी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कुलाब्यात २१.४ मिमी आणि सांताक्रूझमध्ये २८ मिमी पावसाची नोंद झाली. या दोन्ही विभागांत मागील २४ तासांत अनुक्रमे ७८.६ आणि ६५.९ मिमी पाऊस झाला आहे.
१) शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहर विभागात ३५.७२ मिमी, पूर्व उपनगरात ३३.३० आणि पश्चिम उपनगरात २२.९२ मिमी पाऊस नोंदवला गेला. पुढील २४ तासांत आकाश अंशतः ढगाळ राहून अधूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.
२) पावसामुळे शहरात १० ठिकाणी झाडे किंवा झाडांच्या फांद्या कोसळल्या. पश्चिम उपनगरात ७, तर पूर्व उपनगरात ७ ठिकाणी असे प्रकार घडले. शहरात ३ आणि पूर्व उपनगरात एका ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. तर पूर्व उपनगरात दोन ठिकाणी घराचा काही भाग कोसळण्याची घटना घडली. मात्र, त्यात कोणालाही दुखापत झाली नाही.