Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मेट्रो ६' च्या कारशेड उभारणीच्या कामाचा मार्ग मोकळा; 'MMRDA' कडून इन्व्हेस्टिगेशन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 10:53 IST

मेट्रो ६ मार्गिकेची लांबी १५.३१ कि.मी. असून त्यावर १३ स्थानके असतील.

मुंबई : स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो ६ मार्गिकेच्या कांजूरमार्ग येथील कारशेडच्या जागेवर जिओ टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनला नुकतीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच या मेट्रो मार्गिकेच्या कारशेडच्या उभारणीला सुरुवात होणार आहे. 

मेट्रो ६ मार्गिकेची लांबी १५.३१ कि.मी. असून त्यावर १३ स्थानके असतील. जेव्हीएलआरवरून पवई येथून ही मेट्रो मार्गिका पुढे जाणार आहे. या मार्गिकेमुळे ओशिवारा ते कांजूरमार्ग हा प्रवास जलद होणार आहे तसेच पश्चिम आणि पूर्व उपनगरे एकमेकांना जोडली जातील. त्यातून या भागातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मदत मिळणार असून त्यांना तासन्-तास वाहतूक कोंडी अडकून राहावे लागणार नाही. या मेट्रो मार्गिकेचे बहुतांश कामे पूर्णत्वास गेली आहेत. मात्र, कांजूरमार्ग येथील जागेचा तिढा निर्माण झाल्याने कारशेडचे काम रखडले होते. मात्र, आता हा प्रश्नही सुटला असून एमएमआरडीएने मेट्रो कारशेडच्या उभारणीसाठी कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. सॅम बिल्टवेल या कंत्राटदाराला ५०८ कोटी रुपयांना हे काम देण्यात आले आहे. कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागेवर हे कारशेड उभारले जाणार आहे. कंत्राटदाराने जुलै महिन्याच्या सुरुवातीस या भागातील माती परीक्षणाचे काम सुरू केले आहे. 

३० महिने लागणार-

पुढील एक ते दोन महिने हे काम चालणार आहे. त्यानंतर कंत्राटदाराकडून कारशेडचे डिझाईन अंतिम करून ते मान्यतेसाठी एमएमआरडीएकडे पाठविले जाईल. एमएमआरडीएकडून या डिझाईनला मान्यता मिळताच कारशेडच्या प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. 

कारशेडच्या उभारणीचे काम -

सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी ही मेट्रो मार्गिका सुरू होण्यासाठी आणखी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे. या कारशेडच्या उभारणीसाठी ३० महिन्यांचा कालावधी लागणार आहे. 

प्रकल्पाची वैशिष्ट्ये- मेट्रोची लांबी १५.३१ किमी- 

१) स्थानके - १३ 

२) खर्च - ६७१६ कोटी रु. 

३) अपेक्षित प्रवासी- ७.७ लाख

जेव्हीएलआरवरून जाणाऱ्या मार्गिकेमुळे विक्रोळी ते अंधेरी प्रवासाचा वेळ ३० ते ४५ मिनिटांनी घटणार.

जागेच्या तिढ्यामुळे प्रकल्प रखडला-

१) या मेट्रो मार्गिकेसाठी सुमारे ६ हजार ७१६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मेट्रो ६ मार्गिकेच्या उभारणीच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली. त्यावेळच्या अंदाजानुसार ही मेट्रो २०२२ च्या अखेरीस सुरू होणे अपेक्षित होते.

२) कारशेडच्या जागेच्या तिढ्यामुळे हा प्रकल्प चांगलाच रखडला होता. परिणामी आता मेट्रो ६ मार्गिका सुरू होण्यासाठी २०२६ उजाडणार आहे.

टॅग्स :मुंबईमेट्रोएमएमआरडीए