Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो ‘२ अ’, ‘७’ मार्गिकेवरही लवकरच स्मार्ट बँड; प्रवाशांची तिकिटाच्या रांगेतून सुटका होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 09:52 IST

प्रवाशांच्या सोयीसाठी महामुंबई मेट्रोकडून स्मार्ट बँड आणण्याचा विचार सुरू आहे.    

मुंबई : महामुंबईमेट्रो संचलन मंडळाकडून चालविण्यात येणाऱ्या नव्या डी. एन. नगर ते दहिसर मेट्रो २ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर मेट्रो ७ मार्गिकेवरील प्रवाशांची आता तिकिटासाठी रांगेत उभे राहण्यापासून सुटका होण्याची चिन्हे आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी महामुंबई मेट्रोकडून स्मार्ट बँड आणण्याचा विचार सुरू आहे.    

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (एनपीसीआय) त्यादृष्टीने महामुंबई मेट्रोसाठी ऑन द गो ट्रॅव्हल बँड आणि  एनसीएमसी वॉच नावाची नवी तिकीट प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

१) तिकिटांसाठी प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागू नये किंवा क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढण्याची गरज पडू नये यासाठी ही नवी प्रणाली विकसित केली जात आहे. 

२) एसबीआय, एनपीसीआयद्वारे ही  पेमेंट प्रणाली विकसित केली जात आहे. प्रवाशांना रिचार्ज करून या बँडमध्ये पैसे जमा करता येणार आहेत. 

‘मेट्रो वन’वर एप्रिलपासूनच सुरुवात-

मेट्रो वन मार्गिकेवर एप्रिल महिन्यात ही प्रणाली बसविण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांत या मेट्रो मार्गिकेवर ६९३ प्रवाशांनी या स्मार्ट बँडची खरेदी केली असून, त्यांच्याकडून प्रवासासाठी ही नवी प्रणाली वापरली जात आहे.

काय आहे स्मार्ट बँड?

हातात परिधान केल्या जाणाऱ्या बँडसारखे हे स्मार्ट बँड असेल. या स्मार्ट बँडमुळे वॉलेटमध्ये मेट्रो कार्ड किंवा बॅगेत तिकीट बाळगावे लागणार नाही. 

मेट्रो स्थानकावर मोबाइल काढून क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नसेल. मेट्रो स्थानकाच्या एएफसी गेटवर फक्त मनगटावर लावलेल्या बँडवर टॅप करून मेट्रो स्थानकावर प्रवेश करता येईल.त्यातून तिकीट काढण्याची किंवा मोबाइलमधील क्यूआर कोड स्कॅन करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यातून प्रवाशांच्या वेळेची बचत होईल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. 

टॅग्स :मुंबईमेट्रोएमएमआरडीए