Join us

जे. जे. हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलचे नूतनीकरण होणार कधी? विद्यार्थ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 11:45 IST

वर्षभरापासून सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामामुळे येथील निवासी डॉक्टरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबई : कुठे प्लास्टरचे सुरू असलेले काम... अस्ताव्यस्त पसरलेल्या सिमेंटच्या गोण्या... रंगकामासाठी इमारतीबाहेर बांधलेले बांबू, डोक्यावर सामानाच्या गोण्या घेऊन सतत होणारी कामगारांची ये-जा... हे चित्र आहे जे. जे. हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलचे. यामध्ये ३०० खोल्यांमध्ये साधारण ३४० डॉक्टर राहतात. रुग्णालयामध्ये ड्यूटीवर जाण्यासाठी त्यांना याच गोंधळात लगबग करावी लागते. 

वर्षभरापासून सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामामुळे येथील निवासी डॉक्टरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाने लक्ष घालून नूतनीकरणाचे काम लवकर संपवले पाहिजे, असे येथील निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे.

वर्षभरापासून रुग्णालयाच्या नूतनीकरणासह निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलचे नूतनीकरणही हाती घेण्यात आले आहे. कामासाठीच्या विलंबामुळे आणखी किती दिवस हा त्रास सहन करावा लागणार, असा सवाल संतप्त निवासी डॉक्टरांकडून विचारण्यात येत आहे. कामासाठी हातोडी ठोकण्याच्या आवाजाने तेथील शांततेचा भंग होत आहे. अभ्यास आणि रुग्णालयातील कामे करताना या नूतनीकरणाच्या कामामुळे गेले वर्षभर निवासी डॉक्टर हैराण झाले आहेत. याबाबत रुग्णालय प्रशासनाने संबंधित कंत्राटदारांना हे काम पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून होत आहे.

टॅग्स :मुंबईजे. जे. रुग्णालयविद्यार्थी