मुंबईकरांना आवडे मेट्रो! सप्टेंबरमध्ये एका दिवसात पावणेतीन लाख जणांचा प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 09:46 IST2024-09-24T09:44:05+5:302024-09-24T09:46:29+5:30

डी. एन. नगर ते दहीसर पूर्व ‘मेट्रो २ अ’ आणि अंधेरी पूर्व ते दहीसर पूर्व ‘मेट्रो ७’ या मार्गिकेवर सप्टेंबर महिन्यातील एका दिवसात पावणेतीन लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.

in mumbai citizens like metro fifty three lakh people travel in one day in september  | मुंबईकरांना आवडे मेट्रो! सप्टेंबरमध्ये एका दिवसात पावणेतीन लाख जणांचा प्रवास 

मुंबईकरांना आवडे मेट्रो! सप्टेंबरमध्ये एका दिवसात पावणेतीन लाख जणांचा प्रवास 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : डी. एन. नगर ते दहीसर पूर्व ‘मेट्रो २ अ’ आणि अंधेरी पूर्व ते दहीसर पूर्व ‘मेट्रो ७’ या मार्गिकेवर सप्टेंबर महिन्यातील एका दिवसात पावणेतीन लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. एका दिवसातील प्रवासी संख्येने आतापर्यंतचा हा सर्वोच्च आकडा पार करून २ लाख ८१ हजारांचा आकडा गाठला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या मेट्रो मार्गिकांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रवासीसंख्येचा २ लाख ६० हजारांचा टप्पा पार केला होता. 

प्रवासीसंख्या वाढतीच-

१)  ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकेचा डहाणूकरवाडी ते आरे हा पहिला टप्पा २ एप्रिल २०२० रोजी सुरू झाला. मात्र, त्यावेळी मेट्रो मार्गिकेला अंधेरी येथील मेट्रो १ मार्गिकेची जोडणी नसल्याने प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत होता. पहिल्या आठ महिन्यांत या मेट्रो मार्गिकेवरून फक्त ८९ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. 

२)  मात्र, या मेट्रोचा दुसरा टप्पा २० जानेवारी २०२३ मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. मार्गिकेवरून २० जानेवारी २०२३ ते २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ७ कोटी १७ लाख प्रवाशांनी प्रवास केला. २८ मेपर्यंत यात आणखी दोन कोटी प्रवाशांची भर पडली. मे महिन्यापर्यंत या दोन्ही मेट्रो मार्गिकांवर २ लाख ४० हजार प्रवासी प्रवास करत होते. 

२४ गाड्या, २८२ फेऱ्या-

दरम्यान, सध्या या मार्गिकेवर २४ मेट्रो गाड्यांच्या माध्यमातून सेवा दिली जाते. दरदिवशी २८२ फेऱ्यांमधून या मार्गिकेवर प्रवाशांना सेवा दिली जाते. मंडाले ते डी. एन. नगर मेट्रो २ बी मार्गिका आणि मीरा भाईंदर ते दहीसर मेट्रो ९ मार्गिका सुरू झाल्यावर प्रवासी संख्येत आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा एमएमआरडीएने व्यक्त केली आहे.

१) सध्याची सर्वाधिक प्रवासी संख्या- २,८१,२४९

२) दोन्ही मेट्रो मार्गिकेवरील स्थानके- ३० स्थानके

Web Title: in mumbai citizens like metro fifty three lakh people travel in one day in september