पालिकेची बांबू लागवड बासनात? शहरात जागा उपलब्ध नसल्याने प्रशासनापुढे अंमलबजावणीचा पेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 09:30 IST2024-09-25T09:28:02+5:302024-09-25T09:30:30+5:30
मुंबईत अलीकडच्या काळात प्रदूषण कमालीचे वाढल्याने त्यावर उपाय म्हणून या उपक्रमाला वेगाने चालना देण्यात आली.

पालिकेची बांबू लागवड बासनात? शहरात जागा उपलब्ध नसल्याने प्रशासनापुढे अंमलबजावणीचा पेच
जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई हिरवीगार व्हावी, तसेच प्रदूषण कमी होऊन जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्मिती व्हावी, या उद्देशाने मुंबई महापालिकेने बांबू लागवडीसाठी हाती घेतलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरितीकरण उपक्रम आता गुंडाळला जाण्याची दाट शक्यता आहे. या उपक्रमात पहिल्या टप्प्यात आठ हजार बांबू रोपांची लागवड करण्यात येणार होती. मात्र, त्यासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने पालिकेपुढे पेच निर्माण झाला आहे.
मुंबईत अलीकडच्या काळात प्रदूषण कमालीचे वाढल्याने त्यावर उपाय म्हणून या उपक्रमाला वेगाने चालना देण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पूर्व द्रुतगती महामार्गालगत भांडूप ते विक्रोळी कन्नमवार नगर या पट्ट्यात ८,१०० बांबू लावण्यात येणार आहेत, तसेच दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण शहरात पाच लाख बांबूंची लागवड केली जाणार आहे.
१) २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात तरतूद- ३५४ कोटी
२) २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात तरतूद- १७८ कोटी
नवी मुंबईत यशस्वी-
पामबीच मार्गावर वाहनांच्या धुरातून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने बेलापूर ते वाशीदरम्यान सहा हजार बांबूंची यशस्वी लागवड केली आहे, तसेच तुर्भे येथील डम्पिंग ग्राऊंड परिसरात आणि मोरबे धरणाच्या आसपासही बांबूची लागवड केली जाणार आहे.
उद्यानांनाही आक्षेप-
उद्यानांमध्ये बांबूची लागवड करता येईल का, याची चाचपणी करण्यात आली. मात्र, त्यातून उद्यानाच्या बाह्य सौंदर्यावर परिणाम होईल, असा आक्षेप घेण्यात आल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मिठागरांच्या जागेवर मनाई-
१) या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मार्च महिन्यापासून पालिकेच्या उद्यान खात्याने भांडुप ते विक्रोळी पट्ट्यात बांबू लागवडीची प्रक्रिया सुरू केली.
२) या जागेत मिठागरे असून जागेच्या मालकीवरून न्यायालयात संघर्ष सुरू आहे. त्यामुळे या जागेत बांबू लागवड करता येणार नाही, असे स्पष्ट करत मीठ आयुक्तालयाने पालिकेला मनाई केली आहे.