Join us
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 06:30 IST

राज्यात १८ आणि १९ नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार असल्याचे स्पष्टीकरण शुक्रवारी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात मतदानाच्या दिवशी शाळांना सुट्टी असली, तरी मतदानाच्या आधी २ दिवस सुट्टीवरुन शाळा व्यवस्थापन, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाच्या परिपत्रकामुळे निर्माण झालेला हा गोंधळ दूर करताना राज्यात १८ आणि १९ नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार असल्याचे स्पष्टीकरण शुक्रवारी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले.

मतदानाच्या आधी २ दिवस कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. फक्त ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झालेली आहे, त्यांच्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे मांढरे यांनी नमूद केले.

अनेक शाळांतील शिक्षकांना निवडणुकीची कामे लागल्याने शिक्षण आयुक्तालयाने १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला सादर केला होता. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले. मात्र, या परिपत्रकामुळे राज्यातील सर्व शाळांना ३ दिवस सुट्टी मिळणार का, असा संभ्रम निर्माण झाल्याने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी आता नव्याने स्पष्टीकरण दिले आहे.

१८ आणि १९ रोजी सर्व शाळा सुरू राहतील. सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाही. ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाली असेल आणि तेथे एकही शिक्षक उपलब्ध नसेल, अशा शाळांबाबत त्या सूचना आहेत.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४शाळामतदान