लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. अनेक शिक्षकांना निवडणूक कर्तव्यावर पाठवले जाणार आहे. त्यामुळे १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत शाळा भरवणे शक्य नसल्यास मुख्याध्यापकांना त्यांच्या अखत्यारित शाळा बंद ठेवण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी आवश्यक सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.
अनेक शाळांमध्ये मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. अनेक शिक्षकांची नियुक्तीही त्यासाठी झालेली आहे. या पार्श्वभूमीवर १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी देण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाने शिक्षण विभागाला सादर केला होता. शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले आहेत.