Join us
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवेतील लोकललाही पावसाचा फटका; जाणून घ्या पश्चिम,मध्य अन् हार्बर रेल्वेची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 10:41 IST

मुसळदार पावसाचा फटका अत्यावश्यक सेवेतील लोकलसेवेला देखील बसला आहे.

मुंबई: मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, सायन, कुर्ला, अंधेरीसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. पुढील 24 तासांत मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच दरम्यान मुसळदार पावसाचा फटका अत्यावश्यक सेवेतील लोकलसेवेला देखील बसला आहे.

मुसळदार पावसामुळे पश्चिम रेल्वेची सेवा विरार ते अंधेरीपर्यतच सुरु आहे. तसेच मध्य रेल्वे धीम्या गतीने सुरु असून हार्बर रेल्वेची सेवा कुर्ला ते सीएसएमटी बंद असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याचे नियोजन कोलमडून गेले आहे.

मुंबईत पावसाचा जोर पाहता मुंबई महापालिकेने लोकांना घरीच थांबण्याचे आणि अतिवृष्टीमुळे कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.  पालिकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. 'बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या व हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे. समुद्रात दुपारी 12.47 च्या सुमारास भरती येणार आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावे" असे आवाहन मुंबई महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. हिंदमातामध्ये तर दोन ते तीन फूट पाणी भरल्याने येथील वाहतूक कोंडी झाली आहे. हिंदमाता येते तर वाहनांमध्ये पाणी शिरल्याने वाहने बंद पडली आहेत. हिंदमातामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पंपाद्वारे पाणी काढण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर, ठाणे जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. ठाण्यात घोडबंदर येथे पाणी साचल्याने या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या- 

...अन्यथा आम्ही त्यांना ठोकून काढणार; मनसेचा ठाकरे सरकारला इशारा

तडीपारीची नोटीस आलेल्या अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी पाठवला खास निरोप; म्हणाले...

Dr Aishaचा कोरोनामुळे मृत्यू?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल फोटो, व्हिडिओमागचं सत्य

'माझ्या विरोधात मोठं षडयंत्र'; अविनाश जाधव यांनी CCTV व्हिडिओद्वारे सादर केला पुरावा

...तर आता आमच्या स्टाईलने चोप देऊ; 'खळ्ळ-खॅटक'वाल्या मनसेला शिवसेनेचा इशारा

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमुंबईलोकलपश्चिम रेल्वेहार्बर रेल्वेमध्य रेल्वेमुंबई महानगरपालिका