‘लोकमत’ची बातमी विधानपरिषदेत; दादरचा अनधिकृत बाजार उठला!, सत्यजीत तांबे मांडली लक्षवेधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 07:15 IST2025-03-08T07:14:04+5:302025-03-08T07:15:41+5:30
दादरमधील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी त्याबाबत विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडली.

‘लोकमत’ची बातमी विधानपरिषदेत; दादरचा अनधिकृत बाजार उठला!, सत्यजीत तांबे मांडली लक्षवेधी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दादरमधील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर महापालिकेने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई करत दादर परिसर फेरीवालामुक्त केला. पालिकेच्या कारवाईमुळे रस्ते स्वच्छ आणि मोकळे झाल्याची प्रतिक्रिया व्यापारी संघाने व्यक्त केली. तसेच ‘लोकमत’च्या वृत्तावर लक्षवेधीवर चर्चा न होताच अधिकऱ्यांनी ही कारवाई केली.
पालिकेची इच्छाशक्ती असेल तर दादर अनधिकृत फेरीवाल्यांपासून आणि अवैध पार्किंगपासून असेच मुक्त राहू शकते, असे दादर व्यापारी संघाने सांगितले. व्यापारी केंद्र म्हणून मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादरमध्ये दररोज हजारो नागरिक ठाणे, नवी मुंबई, कल्याण, कसारा तसेच कर्जत परिसरातून खरेदीसाठी येत असतात. मात्र, अनधिकृत फेरीवाले आणि अवैध पार्किंगमुळे येथे पाय ठेवायलाही जागा नसते. याविरोधात दादर व्यापारी संघाने पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तक्रार केली होती.
सहायक आयुक्तांसोबत बैठक
शुक्रवारी दादर व्यापारी संघटनेकडून जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार अंबी आणि शिवाजी पार्क पोलिस ठाण्यातील अधिकारी यांची बैठक झाली. यावेळी दादर व्यापारी संघाचे ५० अधिकारी उपस्थित होते. यापुढे सातत्याने कारवाई केली जाईल. तसेच वाहतूक पोलिस व पालिका अधिकारी यांची आणखी एक बैठक घेऊन पुढील कारवाईची आखणी करू, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आ. सत्यजीत तांबे यांची लक्षवेधी
दादरमधील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी त्याबाबत विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडली आहे. त्यांची लक्षवेधी शुक्रवारी सुनावणीसाठी आली नाही. मात्र, त्या लक्षवेधीला उत्तर देण्याआधीच महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. तांबे यांनी लक्षवेधीत संपूर्ण महाराष्ट्रातील अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न उपस्थित केला आहे.