Join us

फेब्रुवारीतच मुंबईत उष्णतेची लाट; दोन दिवस मुंबईकरांना बसणार उन्हाचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 18:14 IST

Heatwave in Mumbai: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह आजूबाच्या परिसरात आज आणि उद्या तापमान वाढण्याची शक्यता आहे.

Mumbai Heatwave Alert: फेब्रुवारी संपण्याआधीच राज्यात उकाडा वाढत चालला आहे. देशाच्या इतर भागातही थंडीनंतर आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. अशातच फेब्रुवारी महिन्यातच मुंबईकर होरपळायला लागले आहेत. आता दोन दिवसांत मुंबईकरांचा त्रास आणखी वाढणार आहे. भारतीय हवामान खात्याने २५ फेब्रुवारी आणि २६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या कोकण भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे. या कालावधीत तापमान ३८ अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, उत्तर पश्चिमेच्या अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार आणि बुधवारी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातील कोकण विभागातील इतर शेजारील जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आयएमडीच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी, पुढील दोन दिवस तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवली. २५ आणि २६ फेब्रुवारीला मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.

आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तापमान सामान्यपेक्षा ६-७ अंश सेल्सिअस जास्त आहे.  बुधवारी तापमान एक किंवा दोन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. यानंतर २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी तापमानात १-२ अंश सेल्सिअसची घट दिसून येईल. मात्र ही घट झाल्यामुळे दिलासा मिळणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई आणि आसपासच्या भागात हवामान सामान्य होते. तर तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस दरम्यान होते. फेब्रुवारी हा  वसंत ऋतू असतो आणि होळीनंतर उन्हाळा सुरू होतो. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. यावर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून तापमान वाढल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, वायव्येकडून येणारे वारे कमकुवत असणं आणि आर्द्रता वाढणे ही त्याची प्रमुख कारणे आहेत. याशिवाय जागतिक हवामान बदल आणि शहरीकरणामुळे तापमानात वाढ होत आहे. 

टॅग्स :मुंबईतापमानउष्माघातहवामान अंदाज