गिरगाव चौपाटी परिसरामध्ये अवैध पार्किंग वसुली; पाच जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 03:41 IST2025-05-16T03:40:52+5:302025-05-16T03:41:24+5:30
गावदेवी पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

गिरगाव चौपाटी परिसरामध्ये अवैध पार्किंग वसुली; पाच जणांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गिरगाव चौपाटी बाहेरील परिसरात अवैधरीत्या पार्किंगचे पैसे उकळणाऱ्या टोळीविरुद्ध गावदेवी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तापस पटनाईक (४३) याच्या सांगण्यावरून गौतम कुमार सगल (२७), गौतम हरीश गिरी (२५), सुशांत सोनाथन दास (३१) आणि हेमंत सनातन दास (४५) ही मंडळी पैसे उकळत असल्याचे कारवाईतून समोर आले. त्यानुसार संबंधितांविरुद्ध मंगळवारी गुन्हा नोंदवण्यात आला.
अंधेरीतील रहिवासी अंकुर सचदेव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ते १३ मे रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास अहमदाबादवरून आलेल्या मित्रासोबत कारने गिरगाव चौपाटीवर फिरण्यासाठी आले होते. सुखसागरच्या सिग्नलजवळ कार पार्क करताच एकाने चौपाटीसमोर सार्वजनिक पार्किंग असल्याचे सांगितले.
पावत्याही ताब्यात
या ठिकाणी सार्वजनिक पार्किंगबाबत दरपत्रक लावले आहे. त्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट रक्कम आकारणी करून के. एम. मुन्शी मार्गावर गैरकायदेशीर पार्किंग केल्याचे लक्षात आले. त्यांच्याकडून मिळणाऱ्या पावत्याही पोलिसांनी ताब्यात घेतल्या. चौकशीअंती त्यांचे पार्किंग हटवत कारवाई केली आहे. याप्रकरणी गावदेवी पोलिस अधिक तपास करत आहेत.
...असे उकळले पैसे
गिरगाव चौपाटीसमोर त्यानुसार त्यांनी कार पार्क केली. काही वेळाने ते कार जवळ येताच गावदेवी पोलिसांनी त्यांना नो-पार्किंगमध्ये कार पार्क केल्याबद्दल कारवाई करत असल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे त्यांना धक्का बसला. कार एक तास उभी करण्यासाठी चौकडीकडे १०० रुपये दिल्याचे सचदेव यांनी पोलिसांना सांगितले. वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होणार नाही, अशी हमी त्यांना देण्यात आली होती.
या पार्किंगचे मालक पटनाईक असल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांकडून त्यांना येथे पालिकेचे अधिकृत पार्किंग नसल्याचे समजले. तेव्हा, ही मंडळी पार्किंगच्या नावाच्या पैसे उकळत असल्याचे स्पष्ट होताच, त्यांनी अन्य चालकांकडे चौकशी केली.
त्यावेळी त्यांच्यापैकी काही जणांकडून महिन्याचे चार हजार, तर काही जणांकडून दोन हजार रुपये घेतल्याचे समजले. त्याचबरोबर अन्य चालकांकडूनही तासाला १०० ते १५० रुपये आकारल्याचे पोलिसांसमोरच स्पष्ट झाले.