बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 06:21 IST2025-06-03T06:21:08+5:302025-06-03T06:21:55+5:30
मिठी नदीकाठी विशेषतः टी-२ टर्मिनस क्षेत्राजवळ १० मीटरच्या बफर झोनमध्ये बहुमजली इमारतीचे बेकायदा बांधकाम झाल्याची बाब उघडकीस आली आहे.

बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मिठी नदीकाठी विशेषतः टी-२ टर्मिनस क्षेत्राजवळ १० मीटरच्या बफर झोनमध्ये बहुमजली इमारतीचे बेकायदा बांधकाम झाल्याची बाब उघडकीस आली आहे. मुंबईतील नद्यांच्या बफर झोनमध्ये झालेल्या या बांधकामाच्या प्रकरणात एक हजार कोटींचा घोटाळा झाला असावा, अशी शंका व्यक्त करत वॉचडॉग फाउंडेशनने त्याच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.
मुंबई २०३४च्या विकास आराखड्यात मुंबईतील चारही नद्यांच्या (मिठी, ओशिवरा, दहिसर आणि पोईसर) दोन्ही बाजूंना १० मीटर रुंद बफर झोन निश्चित करण्यात आला आहे. पावसात अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी, नद्यांच्या प्रवाहात अडथळा आणणारे अतिक्रमण रोखण्यासाठी आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी, तसेच लगतच्या भागात पूर रोखण्यासाठी प्रतिबंधक भाग म्हणून हा बफर झोन जाहीर करण्यात आला आहे.
फाउंडेशनच्या पथकाने टी-२ टर्मिनसजवळील मिठी नदीची अलीकडेच पाहणी केली असता, या बफर झोनमध्ये अनेक नवीन बहुमजली इमारती बांधल्याचे आढळून आले. त्यामुळे या बेकायदा बांधकामांची पालिकेने सखोल चौकशी करावी आणि कठोर प्रतिबंधक उपाय राबवावेत, अशी मागणी संस्थेने केली आहे.