Join us  

बेकायदेशीर भोंगे प्रकरण: नवी मुंबई पोलीस आयुक्तांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 4:38 AM

उच्च न्यायालयाने अवमानाप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली

मुंबई : प्रार्थनास्थळावरील बेकायदेशीर भोंगे हटविण्याचे आदेश असतानाही नवी मुंबईमधील प्रार्थनास्थळांवरील भोंगे हटविण्यात न आल्याने उच्च न्यायालयाने अवमानाप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. न्या. अभय ओक व न्या. एम. एस. सोनक यांनी संजय कुमार यांना या नोटीसवर २३ आॅक्टोबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले.२०१६ मध्ये उच्च न्यायालयाने प्रार्थनास्थळांवरील बेकायदेशीर भोंगे हटविण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्यानंतर मूळ याचिकाकर्ते संतोष पाचलग यांनी यासंबंधी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज टाकत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आतापर्यंत किती बेकायदेशीर भोंग्यांवर कारवाई करण्यात आली, याची माहिती सरकारकडून मागितली.पाचलग यांच्या अर्जावर आॅगस्टमध्ये सरकारने उत्तर दिले. राज्यात अजूनही २,९४० प्रार्थनास्थळांवर भोंगे असल्याची माहिती या अर्जाद्वारे पाचलग यांना प्राप्त झाली. याबाबत पाचलग यांनी राज्य सरकार, नवी मुंबई पोलीस आयुक्तांविरुद्ध उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत प्रार्थनास्थळावर ध्वनिक्षेपक लावू नका. अवैध भोंग्यांवर कारवाई करा. ध्वनिप्रदूषण नियमांबाबत जनजागृती करा, शाळा-महाविद्यालयांत प्रबोधन करा, असे आदेश न्यायालयाने २०१६ मध्ये दिले. त्याचे पालन होत नसल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. आवाजाची पातळी मोजण्यासाठी ध्वनिमापक यंत्रे पोलिसांना दिली आहेत. याद्वारे पोलीस आवाजाची पातळी मोजतील, असे आश्वासन सरकारने न्यायालयाला दिले होते.४६ प्रार्थनास्थळेएकट्या नवी मुंबईत ४६ प्रार्थनास्थळांवर बेकायदा भोंगे असल्याने न्यायालयाने नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

टॅग्स :नवी मुंबईपोलिसआयुक्तमुंबई हायकोर्ट