वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे?, मनाचा ठाव घेणाऱ्या इलाही जमादार यांच्या गझल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 01:54 PM2021-01-31T13:54:27+5:302021-01-31T14:01:25+5:30

गझल नवाज इलाही जमादार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

ilahi jamadar ghazal and poems | वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे?, मनाचा ठाव घेणाऱ्या इलाही जमादार यांच्या गझल

वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे?, मनाचा ठाव घेणाऱ्या इलाही जमादार यांच्या गझल

googlenewsNext

मराठी गझलविश्वात आपल्या अनोख्या शैलीनं सर्वांच्या मनात घर केलेले प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांनी आज जगाचा निरोप घेतला. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. इलाही जमादार यांनी मराठीसह, हिंदी, उर्दूमधून अनेक गझल आणि कविता लिहील्या आहेत. इलाही यांच्या जाण्यानं गझल विश्वावर शोककळा पसरली आहे. गझल नवाज इलाही जमादार यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांनी लिहिलेल्या मराठीतील काही गझल आणि कवितांचा हा संग्रह...

वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे

रोज अत्याचार होतो आरशावरती आता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे

अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा

काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा

जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा

माथ्यावरी नभाचे ओझे सदा ईलाही
दाही दिशा कशाच्या हा पिन्जरा असावा

– इलाही जमादार
------------------------------------------------------
 

मुक्तक

व्याकुळ माझ्या, नजरेला दे, नजर प्राशिण्यासाठी
तृषार्त माझ्या, अधराना दे, अधर प्राशिण्यासाठी
वसंतात तू, वसंतात मी, वसंत अवती भवती
मोहरलेल्या, वृक्षाला दे, बहर प्राशिण्यासाठी
नसेल जर का, तुला भरवसा,
नसेल जर का, तुला भरवसा, श्र्वासांची तू, झडती घे
रूप तुझेही, भरून उरले, डोळ्यांची तू, झडती घे
दुसरा तिसरा, विचार नाही, अविरत चिंतन, तुझेच गे
कधी अचानक, धाड टाकुनी, स्वप्नांची तू, झडती घे
तेल, वात अन्‌, ज्योत दिव्याची, तुझी आठवण, आणी मी
कसे तुला, समजावू वेडे, प्राणांची तू, झडती घे
क्षणाक्षणावर, तुझाच ताबा, तुझीच सत्ता, सभोवती
वाटल्यास मम, रोजनिशीच्या, पानांची तू, झडती घे
कळेल तुजला, कळेल मजला, भाकित अपुल्या, प्रीतीचे
तुझ्या नि माझ्या, तळहातांच्या, रेषांची तू, झडती घे
या ह्रदयाचा, अथांग सागर, नभी चंद्रमा, रूप तुझे
काठाची तू, झडती घे अन्‌, लाटांची तू, झडती घे
अजुन कोणता, हवा पुरावा सांग ‘इलाही’ सांग तुला
तुझ्याच रंगामध्ये रंगलो, ग़ज़लांची तू, झडती घे

– इलाही जमादार 
-------------------------------------------------

मुंबई

वरून दिसते आम्रतरूसम मोहरली मुंबई
हाय! परंतू ऋतू जाणतो पोखरली मुंबई

पोटासाठी अनाथ अगतिक आला आश्रयाला
निवार्‍यास अंथरली त्याने पांघरली मुंबई

लहान होती अल्लड होती एके काळी तीहि
अशी बहकली कुणीच नाही सावरली मुंबई

जशी केतकी बनात चाले सत्ता भुजंगांची
तशी अवस्था बघून इथली घाबरली मुंबई

तिच्या दुधावर उदंड झाली पहा तिची लेकुरे
बॉम्बस्फोट जाहले तेधवा हादरली मुंबई

काय आणखी असे वेगळे मुंग्यांचे वारूळ
अफाट गर्दी मधे बिचारी चेंगरली मुंबई

हात धुराचे सरकत सरकत कंठाशी पोचले
प्रदूषणाने फास अवळला गुदमरली मुंबई

कधी जिवाची होती आता जिवावरीहि उठली
विषकन्येसम मला ‘इलाही‘ जाणवली मुंबई

– इलाही जमादार
--------------------------------------------

घर वाळूचे बांधायाचे

घर वाळूचे बांधायाचे
स्वप्न नसे हे दिवाण्याचे…

सहज बोलली,निघून गेली
झाले, गेले ,विसरायाचे……

आरशात मी, आरशा-पुढे
कोण तोतया,समजायाचे….

ठरविल्याविना ,ठरले आहे
स्वप्नामध्ये भेटायाचे….

– इलाही जमादार
-------------------------------------------------

सांजवेळी सोबतीला

सांजवेळी सोबतीला, सावली देऊन जा…
भैरवी गाईन मी, तू मारवा गाऊन जा…

मी जपोनी ठेविल्या, संवेदना स्पर्शातल्या,
त्या खुणांचे ताटवे, तू एकदा फुलवून जा…

पेरला श्वासातुनी मी गंध ओल्या प्रीतिचा,
धुंद मी माझ्यात आहे, धुंद तू होऊन जा…

घेतला झोळीत माझ्या, मी व्यथेचा जोगवा,
एकदा हातात माझ्या, हात तू देऊन जा…

या पुढे जमणार ना तुज, ओळखीचे, पाहणे,
त्या तुझ्या नजरेत मजला, तू जरा भिजवून जा…

नववधू होऊन तू, जाशील जेव्हा, त्या घरी,
त्या घराच्या वळचणीला, आठवण, ठेवून जा…

– इलाही जमादार
 

Web Title: ilahi jamadar ghazal and poems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.