विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 07:03 IST2025-11-06T07:03:06+5:302025-11-06T07:03:52+5:30
देशातील इतर महत्त्वाच्या संस्थांचे स्थानही घसरले

विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : क्यूएस वर्ल्ड रँकिंगतर्फे जाहीर करण्यात येणाऱ्या आशियाई युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील ७३ टक्के विद्यापीठांची घसरण झाली. यामध्ये आयआयटी मुंबईची ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी, तर माटुंग्यातील आयसीटी या शिक्षण संस्थेची ३३६ व्या स्थानावरून ४२१ व्या स्थानी घसरण झाली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रँकिंगमध्येही मोठी घसरण झाली असून, गेल्या वर्षीच्या १७३ व्या स्थानावरून हे विद्यापीठ २०७ व्या स्थानी गेले. मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षीची कामगिरी कायम ठेवत २४५ वे स्थान मिळविले. क्वॉकरेली सायमंड ( क्यूएस) यांनी आशियाई विद्यापीठांची क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंग २०२६ जाहीर केली. यादीत हाँगकाँगच्या युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगने प्रथम, तर चीनच्या पेकिंग युनिव्हर्सिटीने द्वितीय स्थान पटकाविले.
सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरने तिसरा क्रमांक पटकाविला. भारतातील आयआयटी दिल्ली या शिक्षण संस्थेने यादीत ५९ वे स्थान पटकाविले आहे. गेल्या वर्षीच्या ४४ व्या स्थानावरून ही घसरण झाली. त्यानंतरही भारतीय शिक्षण संस्थांमध्ये आयआयटी दिल्लीचा प्रथम क्रमांक राहिला.
टॉप १०० शिक्षण संस्थांच्या यादीत ७ विद्यापीठे
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचीही मोठी घसरण झाली. २०२५ मधील ६२१-६४० या रँकमधून विद्यापीठ ८०१ - ८५० रँकपर्यंत खाली गेले. आशियातील टॉप १०० शिक्षण संस्थांच्या यादीत देशातील ७ विद्यापीठांना स्थान मिळाले, तर टॉप २०० मध्ये २० आणि टॉप ५०० मध्ये ६६ संस्थांना स्थान मिळाले. आयआयटी मुंबईने एम्प्लॉयर रेप्युटेशनमध्ये एशियामध्ये ११ वे स्थान मिळविले.
१०५ शिक्षण संस्थांच्या स्थानात घसरण
भारतातील ३६ शिक्षण संस्थांच्या यादीत स्थान वधारले आहे, तर १६ शिक्षण संस्थांना गेल्या वर्षीचे स्थान राखण्यात यश मिळाले आहे, तर १०५ शिक्षण संस्थांची घसरण झाली आहे.