Join us  

'आर.आर आबा तुम्ही असता तर सरकारच स्थापन केलं असतं' 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 7:05 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी सर्वांचेच आभार मानले. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाच्या सदस्यांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठकीत अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्या नावाला अनुमोदन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी सर्वांचेच आभार मानले. यावेळी अजित पवारांनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची आठवण काढली. आर. आर. पाटील आज असते तर राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच स्थापन केले असते असे अजित पवार म्हणाले. याचबरोबर, दिवाळीत सुद्धा सत्ताधारी पक्षाला गोड खाता आले नाही असा टोला अजित पवार यांनी भाजपाला लगावला आहे. ते म्हणाले, “आपण आपल्या निवडणुकीतील कामावर खूश आहोत. मात्र, सत्ता स्थापन करण्याचा दावा करणारे मात्र, आनंदी नाहीत. जनतेने आपल्याला मजबूत विरोधीपक्षासाठी कौल दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण विरोधी पक्षात राहून अनेक प्रश्न ताकदीने मांडू.”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, डी. पी. त्रिपाठी, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, पक्षाचे  सर्व नवनिर्वाचित आमदार आणि विधान परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्याने विरोधी पक्षनेतेपदाची संधी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. 

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019