पावसाळ्यात 'हँडशेक' करणार, तर 'अॅडिनो' व्हायरस डोळे येणार, काळजी घेण्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:50 IST2025-07-22T15:49:19+5:302025-07-22T15:50:11+5:30
पावसाळा सुरू झाली की उष्णतेपासून होणार त्रास कमी होऊन दिलासा मिळतो. मात्र, पाऊस विषाणूजन्य आजारांसाठी पोषक वातावरणातही निर्माण करतो.

पावसाळ्यात 'हँडशेक' करणार, तर 'अॅडिनो' व्हायरस डोळे येणार, काळजी घेण्याचा सल्ला
पावसाळा सुरू झाली की उष्णतेपासून होणार त्रास कमी होऊन दिलासा मिळतो. मात्र, पाऊस विषाणूजन्य आजारांसाठी पोषक वातावरणातही निर्माण करतो. यामध्ये अनेक रोगांचा समावेश असला तरी डोळ्यांच्या संसर्गाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. विशेषत: अॅडिनोव्हायरसमुळे डोळे येणे हा प्रमुख त्रासदायक आजार बळावतो.
अॅडिनो व्हायरस मुख्यत: एकमेकांच्या संपर्कातून पसरतो. संक्रमित व्यक्ती डोळ्यांना हात लावून पुन्हा विविध ठिकाणी स्पर्श करते आणि त्यामुळे इतरांपर्यंत हा विषाणू पसरतो. या संसर्गात डोळ्यांमध्ये खाज येणे, पाण्यासारखा स्राव, लालसरपणा आणि पापण्या सुजणे ही लक्षणे दिसतात. काही रुग्णांमध्ये सर्दी-तापानंतर साधारण सातव्या दिवशी डोळ्यांची लक्षणे दिसून येतात.
संसर्ग टाळण्यासाठी काय कराल?
डोळ्यांना अनावश्यक स्पर्श किंवा चोळणे टाळा, हात नेहमी साबणाने स्वच्छ धुणे, रुमाल, टॉवेल, सौंदर्यप्रसाधने इतरांशी शेअर करू नका, कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असल्यास योग्य स्वच्छता, काळजी घ्या, समाज माध्यमावरील उपयांवर विश्वास न ठेवता डॉक्टरांचा सल्ला घ्या, ही लक्षणे दिसताच तत्काळ नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लवकर निदान व उपचाराने संसर्ग रोखता येतो आणि इतरांपर्यंत पसरण्याचा धोका टाळता येऊ शकतो, कारण प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे.
संसर्गामागची प्रमुख कारणे अशी आहेत...
वारंवार अस्वच्छ हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे किंवा डोळे चोळणे, हात स्वच्छ न ठेवणे ही अॅडिनोव्हायरसचा संसर्ग होण्यामागची प्रमुख कारणे आहेत. याशिवाय, गुलाबपाणी, हर्बल थेंब यांसारख्या ऐकीव आणि घरगुती उपायांमुळे संसर्ग वाढण्याचा धोका संभवू शकतो.
अॅडिनो व्हायरसच्या संसर्ग झालेल्या व्यक्तीने दोन्ही हात स्वच्छ धुवावेत. गॉगलचा वापर करणे, वेगळा रुमाल ठेवा किंवा टिशू पेपरचा वापर करावा, पोहायला जाणे टाळावे. कारण त्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही गोळ्या, औषधे घेऊ नये. हा संसर्ग पाच ते पंधरा दिवसांत बरा होतो. पण याबाबतची काळजी घेणे गरजेचे आहे.
- प्रो. डॉ. चारुता मांडके, नेत्ररोग तज्त्र, विभागप्रमुख (अतिरिक्त), कूपर रुग्णालय.