दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 06:53 IST2025-11-02T06:52:45+5:302025-11-02T06:53:44+5:30
मोर्चात ठाकरे बंधूंचे सर्वांना आवाहन; शरद पवार म्हणाले- एकजूट टिकवा; थोरात म्हणतात- आधी दुरुस्ती, मगच निवडणुका

दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आगामी निवडणुकीत मतचोर, दुबार मतदार जिथे दिसेल तिथे त्याला फटकविण्याचे काम करा, असे आवाहन उद्धव आणि राज या दोन ठाकरे बंधुंनी महाविकास आघाडी व मनसेतर्फे मतदार याद्यांमधील घोळाच्या निषेधार्थ काढलेल्या भव्य ‘सत्याच्या मोर्चा’समोर बोलताना शनिवारी केले. ‘आपली विचारधारा वेगळी असेल पण संसदीय लोकशाही आणि जनतेचा मताधिकार टिकवण्यासाठी अशीच एकजूट ठेवा’ अशी साद ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घातली. ‘आधी मतदारयाद्या दुरुस्त करा अन् मगच निवडणुका घ्या’ अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
राज ठाकरे यांचे लोकलने मोर्चाला पोहोचणे, मोर्चाआधी उद्धव ठाकरेंशी त्यांनी केलेली चर्चा, मोर्चातील सहभागाविषयीची शंका दूर करत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिलेला सहभाग आणि विविध विरोधी पक्षांच्या कार्यकर्ते, समर्थकांचा मोठा उत्साही सहभाग यामुळे मोर्चा लक्षणीय ठरला. आझाद मैदानासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मतचोरी, दुबार मतदारांची मोठी संख्या या मुद्यांवरून ठाकरे बंधू, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय व राज्य निवडणूक आयोग तसेच केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली. काँग्रेसचे विधानसभेतील नेते विजय वडेट्टीवार, शेकापचे जयंत पाटील, भाकप, माकपसह अन्य विरोधी पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते.
मोर्चानंतर आझाद मैदानावरील सभेत कोण काय म्हणाले?
विश्वासाला धक्का बसला
विधानसभा निवडणुकीत जे प्रकार झाले यामुळे सामान्य माणसाचा संसदीय लोकशाहीवरचा विश्वासाला धक्का बसला आहे. आज सत्तेचा सर्रास गैरवापर केला जात असताना आपण सगळे पडेल ती किंमत देऊन ही चोरी थांबवू.
-शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष
यादीतील चेहरे तपासा
घराघरात जा, याद्यांवर काम करा, चेहेरे कळले पाहिजेत, चेहरे तपासा, त्यानंतर जर तिकडे दुबार-तिबार वाले आले, तिथेच फोडून काढायचे, बडवायचे आणि मग पोलीसांच्या हातात द्यायचे, त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत.
-राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
निर्णय घ्यायला जनता सक्षम
मतचोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकवायला पाहिजे. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही, पण कायद्याचा खोटा दांडूका आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचे काय करायचे हा निर्णय घ्यायला जनता सक्षम आहे.
-उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, उद्धवसेना
पुरावे दिले, उत्तर मिळालेच नाही
विधानसभेची बोगस, दुबार नावे असलेली मतदार यादीच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वापरली जाणार आहे. तसे होऊ नये. आधी याद्या दुरुस्त करा. मगच निवडणूक घ्या. आम्ही आयोगाला पुरावे दिले पण आयोगाने उत्तर दिलेले नाही.
-बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ काँग्रेस नेते