Join us  

'अमोल कोल्हेंना चुकीच्या पद्धतीने बदनाम कराल तर आयुष्यभर जप करत बसावं लागेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 1:00 PM

अक्षय बोऱ्हाडे या तरुणाने फेसबुक लाईव्हद्वारे जुन्नर तालुक्यातील साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर याच्यावर मारहाणीचे आरोप केले. गेल्या ३ वर्षापासून मी छत्रपती शिवरायांच्या विचाराने समाजाची सेवा करत आहे.

मुंबई - सोशल मीडियावर अक्षय बोऱ्हाडे नामक एका तरुणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये या तरुणाने दावा केला आहे की, शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर, निराधार लोकांची सेवा करत असल्याने जुन्नरमधील बड्या राजकीय नेत्याकडून आपणास मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिरुर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपलं मत व्यक्त करताना, नाण्याची दुसरी बाजू तपासणेही गरजेचं असल्याचं म्हटले होते. त्यानंतर, सोशल मीडियातून आणि काही शिवभक्तांकडून अमोल कोल्हे यांच्यावर टीका करण्यात आली. आता, कोल्हेंवरील या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलंय. 

अक्षय बोऱ्हाडे या तरुणाने फेसबुक लाईव्हद्वारे जुन्नर तालुक्यातील साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर याच्यावर मारहाणीचे आरोप केले. गेल्या ३ वर्षापासून मी छत्रपती शिवरायांच्या विचाराने समाजाची सेवा करत आहे. निराधार, गरीब लोकांना जेवण देण्याचं त्यांना न्याय देण्याचं काम केलं, कधीही स्वत:चा विचार केला नाही. माझं कुटुंबदेखील माझ्यासोबत काम करत आहे. काही राजकीय मंडळींनी मला त्यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण केली. मला बंदूक दाखवून त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, मोबाईल काढून घेतला. तसेच माझा व्हिडीओ काढून पैसे घेतल्याचं बतावणी करण्यात आली. पैशाच्या जोरावर मला मारहाण केल्याचं म्हटले होते. याबाबत, खासदार अमोल कोल्हे यांनी आपल मत व्यक्त केलं होतं. 

अक्षय बोऱ्हाडेंच्या अनुषंगाने मला अनेकांचे फोन आले. अक्षयच्या कामाचं मलाही कौतुकच आहे, पण अक्षयने आरोप केलेले सत्यशील शेरकर आणि मी, आम्ही दोघेही समाजकारणात येण्याअगोदरपासूनच चांगले मित्र आहोत. सत्यशील शेरकरांनादेखील मी जवळून ओळखतो. त्यामुळे, याप्रकरणी नाण्याची दुसरी बाजू तपासून पाहणेही तितकेच गरजेचे आहे. तरी, याप्रकरणात कोणावर अन्याय झाला असेल तर कोणालाही पाठिशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सूचना संबंधित पोलीस खात्याला मी आधीच केली आहे, असे कोल्हे यांनी म्हटले होते.  कोल्हेंच्या या सावध प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियातून कोल्हेंवर टीका करण्यात आली. अनेकांनी कोल्हेंच्या या भूमिकेवर नाराजी दर्शवत त्यांच्याविरुद्ध मत व्यक्त केलं. कोल्हेंसंदर्भातील या भूमिकेवरुन विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या टि्वटर अकाऊंटवरुन कोल्हेंची बाजू घेतली आहे. 

शिखंडीच्या आडून बाण मारू पाहणाऱ्यांनी एक कायम लक्षात घ्यावे राष्ट्रवादीपक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हेजी महाराष्ट्रातील तमाम तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यांना चुकीच्या पद्धतीने बदनाम कराल तर भविष्यात फक्त जप करत बसावं लागेल, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी खासदार अमोल कोल्हेंची बदनामी करणाऱ्यांना, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.  

टॅग्स :डॉ अमोल कोल्हेमुंबईराष्ट्रवादी काँग्रेससोशल मीडियाजुन्नर