मुंबई : अनेक नागरिकांना मोबाइलचे व्यसन लागले आहे. रात्री उशिरापर्यंत अनेक जण व्हिडीओ पाहत असतात. त्यामुळे लवकर झोप लागत नाही. झोप पूर्ण होत नसल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यावर उपाय म्हणून झोपण्यापूर्वी तासभर अगोदर मोबाइलचा वापर करू नये, असा सल्ला आता निद्रानाशावर वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात येतो.
प्रत्येक व्यक्तीला चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची आहे. झोपेचे महत्त्व अनेकदा अधोरेखित करूनही काही तरुण झोपेच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहत नाहीत. परिणामी, वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर हळूहळू त्याचे परिणाम दिसू लागतात. त्याचा फटका आरोग्याला बसतो. सध्याच्या स्पर्धेच्या काळात अनेक जण ताणतणावात जगत असतात. काही जण त्यावर योगासने आणि विविध प्रकारचे व्यायाम करून मात करतात. मात्र, काहींना ते शक्य होत नाही, त्याचा सगळा परिणाम त्यांच्या झोपेवर होतो.
प्रत्येकाला आठ तास झोप आवश्यक असते. काही लहान मुले ९ ते १० तास झोपतात. काही वेळा वयोमानानुसार झोप कमी होते. वृद्धांना ५ ते ६ तास झोप पुरेशी असते. काही जण दुपारी २० ते २५ मिनिटांची ‘पॉवर नॅप’ घेतात. झोपेचे कालचक्र बिघडले, तर त्याचा परिणाम व्यक्तीच्या संपूर्ण दिनक्रमावर दिसून येतो.
चांगल्या आरोग्यसाठी काय कराल?झोपेची वेळ निश्चित करा.झोपेची जागा एकच असावी.झोपेच्या एक तास आधी स्क्रीन पाहू नये.विनाव्यत्यय झोप मिळणे गरजेचे आहे.सायंकाळनंतर चहा, कॉफी टाळावी.नियमित व्यायाम करावा.संतुलित आहार घ्यावा.
चिंता आणि तणावामुळे नागरिकांना झोप लागत नाही. अनेक जण झोप येत नाही, म्हणून मोबाइल बघतात. अनेकांना आता त्याची सवय झाली आहे. मात्र, मोबाइल स्क्रीनचा लाइट आणि रेडिएशनमुळे झोप उडते. झोपण्यापूर्वी दोन तास कोणताही स्क्रीन पाहू नये. झोप न झाल्यास त्याचे शरीरावर परिणाम होतात. त्यामुळे नागरिकांनी पुरेशी झोप घेण्याची गरज आहे.- डॉ. सारिका दक्षीकर, मानसोपचारतज्ज्ञ, जी. टी. रुग्णालय