जाहीरनाम्यावर उत्तर न दिल्यास त्याची होळी, मराठी अभ्यास केंद्राची आग्रही भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:41 IST2026-01-03T12:40:50+5:302026-01-03T12:41:19+5:30
महापालिका निवडणुकांसाठी मराठी अभ्यास केंद्राने तयार केलेला ‘मराठीनामा’ ऑनलाइन पद्धतीने सर्वसामान्य जनतेसाठी खुला केला...

जाहीरनाम्यावर उत्तर न दिल्यास त्याची होळी, मराठी अभ्यास केंद्राची आग्रही भूमिका
मुंबई : काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या ‘उत्तर भारतीयांच्या जाहीरनाम्या’वर स्पष्ट भूमिका मांडली नाही, तर त्याची होळी करणार, अशी भूमिका मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मांडली.
महापालिका निवडणुकांसाठी मराठी अभ्यास केंद्राने तयार केलेला ‘मराठीनामा’ ऑनलाइन पद्धतीने सर्वसामान्य जनतेसाठी खुला केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष आपापले जाहीरनामे जाहीर करत असताना, मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मराठी अभ्यास केंद्राने प्रस्थापित राजकीय पक्षांवर केला.
काँग्रेस पक्षाला उत्तर भारतीयांचा पुळका आहे. म्हणूनच त्यांनी उत्तर भारतीयांसाठी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर आणि आमच्या निवडणुकीसाठीच्या मराठीनामावर त्वरित भूमिका स्पष्ट करावी. उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही मराठीनामात मांडलेल्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन
केंद्राने केले.
प्रभागनिहाय मराठी दक्षता केंद्राची मागणी
मराठी भाषेवरील अन्यायाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी प्रभागनिहाय ‘मराठी दक्षता केंद्र’ स्थापन करावे, ही प्रमुख मागणी मराठी अभ्यास केंद्राने मांडली.
मराठी उमेदवाराला प्राधान्य
मतदारांनी राजकीय पक्ष किंवा धर्म न पाहता मराठी उमेदवारालाच प्राधान्य द्यावे, तसेच मराठी भाषा, शाळा, संस्कृती आणि मराठी माणसाच्या हितासाठी काम करणाऱ्या उमेदवाराची निवड करावी, असे आवाहन मराठी अभ्यास केंद्राने केले.