आजूबाजूला असे लोक असतील तर शत्रूची काय गरज?

By अतुल कुलकर्णी | Updated: December 22, 2025 09:28 IST2025-12-22T09:26:46+5:302025-12-22T09:28:04+5:30

- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई  नसेच्या उमेदवारांनी उद्धवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दिल्याची ...

If there are people like that around, what need is there for enemies? | आजूबाजूला असे लोक असतील तर शत्रूची काय गरज?

आजूबाजूला असे लोक असतील तर शत्रूची काय गरज?

- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

नसेच्या उमेदवारांनी उद्धवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दिल्याची माहिती एका मनसे पदाधिकाऱ्याने दिली. मनसे आणि उद्धवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. या बैठकांमध्ये प्रवेशही नसलेला मनसेचा एक पदाधिकारी पत्रकारांना अशी ‘गोपनीय’ माहिती देत होता. हे असले कार्यकर्ते, पदाधिकारी जवळ असतील तर उद्धव-राज यांना विरोधकांची गरज नाही. 

नगरपालिकांचा निकाल जाहीर झाला आहे. अपेक्षेप्रमाणे भाजपने यश मिळवले. त्याच अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने या यशाचे श्रेय पैशांच्या उधळपट्टीला व निवडणूक आयोग सरकारच्या दावणीला बांधला गेल्याला दिले आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी नगरपालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र पिंजून काढला. हर्षवर्धन सपकाळ, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील यांनी कुठे, किती सभा घेतल्या तेही सांगितले पाहिजे. चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार, संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात, ईश्वरपूर येथे जयंत पाटील यांनी घवघवीत यश मिळवले. याचा अर्थ उघड आहे. बडे नेते जेव्हा स्वतःची निवडणूक म्हणून अशा निवडणुकांमध्ये मैदानात उतरतील तेव्हाच यश मिळते हा या निकालाने शिकवलेला धडा आहे.

महामुंबईतल्या नऊ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता वेग घेईल. मात्र आजूबाजूला कसे पदाधिकारी, कार्यकर्ते असावेत याचा धडा आत्ताच घेण्याची वेळ आली आहे. ज्या पद्धतीची विधाने उद्धव-राजसेनेतील स्वतःला पदाधिकारी म्हणणारे करतात ते पाहिले तर दोघांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे यांच्या जवळपास असणारे अनेक नेते भाजप आणि शिंदेसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. काहीजण ईडीच्या भीतीपोटी, तर काहीजण आणखी काही कारणांमुळे भाजप-शिंदेसेनेविषयी कठोर भूमिका घेताना दिसत नाहीत. मात्र, असे नेते उद्धवसेनेच्या उमेदवारांची यादी ठरवण्याच्या कोअर ग्रुपमध्ये आहेत. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेला सोयीचे आणि अडचणीचे ठरणारे उमेदवार या अशा नेत्यांमार्फत बदलून घेतले जातील. त्यामुळे उद्धव ठाकरे निवडणूक सुरू होण्याआधीच पराभूत होतील, अशी एक जोरदार बातमी राजकीय वर्तुळात फिरत आहे. त्यामुळे रात्रच नाही तर दिवसही वैऱ्याचा आहे, अशी अवस्था उद्धवसेनेची आहे.

काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते भेटले होते. त्यांनी सांगितलेली माहिती जर खरी असेल तर धोक्याच्या घंटेचा आवाज कुठून येत आहे हे ठाकरे बंधूंना शोधावे लागेल. तो नेता म्हणाला, ऐरोली विधानसभा काँग्रेसला अनिकेत म्हात्रे यांच्यासाठी हवी होती. मात्र, उद्धवसेनेने हट्टाने ती जागा मागून घेतली व एम. के. मडवी यांना तेथून उमेदवारी दिली. उमेदवारी मिळाली नाही म्हणून अनिकेत म्हात्रे त्याचवेळी शिंदेसेनेत गेले. निवडणुकीत भाजपचे गणेश नाईक विजयी झाले. शिंदेसेनेचे बंडखोर विजय चौगुले यांना मडवी यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली. मडवी पराभूत झाले. आता ते शिंदेसेनेत गेले आहेत.
पनवेल, उरण, अलिबाग या तीन ठिकाणी शेकापचा चांगला बेस आहे. त्यांच्याकडे चिन्ह नव्हते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत शेकापने तिघांपैकी त्यांना हव्या त्या पक्षाचे चिन्ह घ्यावे असे ठरले. तिथे उद्धवसेनेच्या नेत्यांनी शेकापने आमचेच चिन्ह घ्यावे असा आग्रह धरला. मशाल चिन्हाचा एबी फॉर्मदेखील शेकापच्या तिन्ही उमेदवारांना दिला गेला. अर्ज छाननीच्या दिवशी उद्धवसेनेने दिलेले तिन्ही एबी फॉर्म रद्द केले आणि दुसऱ्याच तीन उमेदवारांना दिले. परिणामी, पनवेल आणि उरणमधून भाजप विजयी झाला. अलिबागमधून शिंदेसेना निवडून आली.

दीपेश म्हात्रे हे शिंदेसेनेत होते. त्यांना उद्धवसेनेने स्वतःच्या पक्षात घेतले आणि डोंबिवली विधानसभेची उमेदवारी दिली. मात्र, तिथे भाजपचे रवींद्र चव्हाण निवडून आले आणि आता दीपेश म्हात्रे भाजपमध्ये 
गेले आहेत. महाड (जि. रायगड) येथून काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांना उद्धवसेनेने स्वतःच्या पक्षात घेतले. ती जागादेखील काँग्रेसकडून घेतली. मात्र, तेथून शिंदेसेनेचे भरत गोगावले जिंकले. पुढे निवडणूक झाल्याबरोबर स्नेहल जगताप राष्ट्रवादी अजित पवार गटात गेल्या. 
ही चार उदाहरणे सांगून काँग्रेसचा नेता म्हणाला, हे तुम्हाला जितके दिसते तितके सरळ वाटते का? भाजप आणि शिंदेसेना कशा पद्धतीने उद्धवसेनेत उमेदवार प्लांट करतात, किंवा उद्धव यांच्या अवतीभोवती असणाऱ्यांना कसे मॅनेज करतात हे तुमच्या लक्षात येते का? जर खरेच असे घडले असेल तर...? या जागांसाठी उद्धवसेनेकडून कोणी बोलणी केली होती? या जागा आपल्याला अशा पद्धतीने घ्यायच्या असा आग्रह कोणी धरला होता? या व अशा प्रश्नांची उत्तरे उद्धव ठाकरे यांनाच शोधावी लागतील, असेही तो नेता सांगत होता. 

भाजप-शिंदेसेनेत नेत्यांचे भाऊ, बायको, मुलगी, भाऊ, वहिनी यांना तिकीट दिले जाईल, अशा चर्चा सुरू असताना उद्धव आणि राज दोन्ही भावांनी, ज्यांच्या घरात राजकीय परंपरा नाही अशा तरुण चेहऱ्यांना शोधून उमेदवारी दिली पाहिजे. हा मुद्दा निवडणुकीचा ‘यूएसपी’ बनवला पाहिजे. महाराष्ट्रभर पडसाद उमटतील असा आवाज मुंबईत केला पाहिजे. राज अतिशय कल्पक आहेत. उद्धव यांच्याकडे आजही कार्यकर्त्यांचे संघटन आहे. सत्ताधाऱ्यांना नाकी दम आणण्याची क्षमता या दोघांमध्ये आहे. भाजपकडे नेत्यांची मोठी फळी आहे. कामाची जबाबदारी देण्याची शिस्तबद्ध पद्धत आहे. ज्याला 
जी जबाबदारी दिली तेवढीच तो पार पाडतो की 
नाही हे बघणारी यंत्रणा आहे. शिंदेसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांचा हात कायम देण्यासाठी पुढे असतो अशी भावना आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला शिंदे तथास्तु म्हणतात. हवे ते देतात, ही त्यांची जमेची बाजू आहे. अशा स्थितीत मतदारांच्या गटर, वॉटर, मीटर, रिकामे फूटपाथ, नाट्यगृह, नागरिकांना रोज भेडसावणारे प्रश्न यांची चर्चा या निवडणुकीत होणार की नाही, हा प्रश्न मतदारांनीच स्वतःला विचारावा. याची उत्तरे कोणत्या पक्षाकडून मिळतील, अशी स्थिती आजतरी दिसत नाही.

Web Title : ऐसे सहयोगियों के साथ, दुश्मनों की क्या जरूरत? आत्मनिरीक्षण का समय!

Web Summary : उद्धव ठाकरे की सेना आंतरिक कलह से त्रस्त है। दलबदल और रणनीतिक गलतियाँ, कथित तौर पर प्रतिद्वंद्वियों का समर्थन करने वाले अंदरूनी सूत्रों द्वारा ईंधन, आगामी चुनावों को खतरे में डालती हैं। कांग्रेस ने पार्टी संरचना के भीतर गहरी साजिशों की चेतावनी दी है। हार से बचने के लिए तत्काल आत्मनिरीक्षण की आवश्यकता है।

Web Title : With such allies, who needs enemies? Introspection time!

Web Summary : Internal strife plagues Uddhav Thackeray's Sena. Defections and strategic errors, allegedly fueled by insider manipulation favoring rivals, imperil upcoming elections. Congress warns of deeper conspiracies within the party structure. Urgent introspection is needed to avoid defeat.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.