"संजय दत्तने 'ती' माहिती दिली असती तर मुंबईत स्फोट झाले नसते"; उज्ज्वल निकमांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 14:22 IST2025-07-15T14:19:55+5:302025-07-15T14:22:53+5:30
मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटांबाबत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम मोठा दावा केला आहे.

"संजय दत्तने 'ती' माहिती दिली असती तर मुंबईत स्फोट झाले नसते"; उज्ज्वल निकमांचा गौप्यस्फोट
Mumbai 1993 Bomb Blast: मुंबईत ३२ वर्षांपूर्वी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. १२ मार्च १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये २५७ लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर आता ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांबद्दल मोठा दावा केला आहे. जर अभिनेता संजय दत्तने शस्त्रास्त्रांनी भरलेल्या गाडीची माहिती दिली असती तर मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट टाळता आले असते, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं. अलिकडेच निकम यांना राज्यसभा सदस्य म्हणून नामांकित करण्यात आले आहे. त्यानंतर एका मुलाखतीमध्ये बोलताना उज्ज्वल निकम यांनी हा दावा केला.
एनडीटीव्हीशी बोलताना उज्ज्व निकम यांनी जर अभिनेता संजय दत्तने ज्या गाडीतून एके-४७ बंदूक उचलली होती त्या गाडीबद्दल पोलिसांना सांगितले असते तर हे स्फोट कधीच झाले नसते असं म्हटलं. बॉम्बस्फोटांच्या काही दिवस आधी, अबू सालेम शस्त्रांनी भरलेली व्हॅन घेऊन संजय दत्तच्या घरी आला होता. त्यात हँडग्रेनेड आणि एके-४७ होती. संजयने त्यातून काही शस्त्रे घेतली. नंतर त्याने सर्व परत केली पण एक एके-४७ ठेवली. पोलिसांना याबद्दल माहिती न देणे हे त्या स्फोटांचे कारण होते ज्यामध्ये इतके लोक मारले गेले, असं उज्ज्वल निकम म्हणाले.
"मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. १२ मार्च रोजी स्फोट झाला. त्याच्या एक दिवस आधी, एक व्हॅन त्याच्या (संजय दत्त) घरी पोहोचली होती. त्यात शस्त्रे, हँडग्रेनेड, एके ४७ भरलेली होती. अबू सालेमने ती आणली होती. संजयने काही हँडग्रेनेड आणि बंदुका उचलल्या होत्या. त्यानंतर, त्याने सर्व काही परत केले आणि फक्त एके ४७ ठेवली. जर त्याने त्यावेळी पोलिसांना माहिती दिली असती तर पोलिसांनी तपास केला असता आणि मुंबई बॉम्बस्फोट कधीच झाले नसते," असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं.
"संजय दत्त निर्दोष होता. त्याला शस्त्रांची आवड होती म्हणून त्याने बंदूक ठेवली. कायद्याच्या दृष्टीने त्याने गुन्हा केला, पण तो एक साधा माणूस आहे. संजयकडे एके-४७ होती, पण त्याने कधीही ती बंदूक चालवली नाही. न्यायालयाने संजयला टाडा कायद्याखाली दहशतवादी मानले नाही, परंतु त्याला बंदी असलेले एक-४७ शस्त्र बाळगल्याबद्दल दोषी ठरवले. नंतर, सर्वोच्च न्यायालयाने त्याची सहा वर्षांची शिक्षा कमी करून पाच वर्षांपर्यंत कमी केली," असंही निकम यांनी सांगितले.
दरम्यान, १२ मार्च १९९३ रोजी मुंबईच्या वेगवेगळ्या भागात १३ बॉम्बस्फोट झाले. यामध्ये २५७ लोकांचा मृत्यू झाला, तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर काही आठवड्यांनी संजय दत्तला अटक करण्यात आली. अबू सालेम आणि रियाज सिद्दीकी यांच्याकडून बेकायदेशीर बंदुका घेतल्याचा, त्या बाळगल्याचा आणि नंतर त्या नष्ट केल्याचा आरोप त्याच्यावर होता. विशेष टाडा कोर्टात सादर केलेल्या पुराव्यांवरून ही शस्त्रे बॉम्बस्फोटांदरम्यान वापरल्या जाणाऱ्या साठ्याचा भाग होती असं मानलं जात होतं.
===============
बार आणि रेस्टॉरंट बंद, ८० कोटींचा महसूल बुडाला
मुंबई : मद्यावरील व्हॅट, परवाना शुल्क आणि मद्यावरील उत्पादन शुल्कात वाढ केल्याविरोधात राज्यभरातील १९ हजारांपेक्षा जास्त बार आणि रेस्टॉरंटनी सोमवारी पुकारलेला बंद १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा आहार संघटनेने केला आहे. तर या बंदमुळे सरकारचा सुमारे ७० ते ८० कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सरकारने मद्यावरील व्हॅट ५ वरून १० टक्के केला. परवाना शुल्कात १५ टक्के वाढ केली. मद्यावरील उत्पादन शुल्कात ६० टक्के वाढ केली आहे. याचा परिणाम म्हणून हॉटेल, रेस्टॉरंट उद्योगावर आर्थिक संकट ओढवले आहे. यातून दिलासा देण्यात यावा, अशी मागणी आहार संघटनेचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी यांनी केली. तर राज्यात हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगात सुमारे १९ हजारांपेक्षा जास्त परवानाधारक बार व लाऊंज आहेत. दरवर्षी हा आकडा ८ टक्के दराने वाढतो. या क्षेत्रात ४ लाखांहून अधिक लोक रोजगारात आहेत तर सुमारे ४८ हजार पुरवठादार या उद्योगावर अवलंबून आहेत. शिवाय १८ लाख लोक अप्रत्यक्षरित्या उद्योगाशी जोडले आहेत, असे शेट्टी यांनी सांगितले.