Join us
Daily Top 2Weekly Top 5

'...तर सगळी प्रॉपर्टी भाजपाला दान करेन', 'ईडी'च्या कारवाईवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 14:49 IST

महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) आज मोठी कारवाई करत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची अलिबागमधील जमीन आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला आहे.

मुंबई-

महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) आज मोठी कारवाई करत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची अलिबागमधील जमीन आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला आहे. ईडीच्या या कारवाईवर संजय राऊतांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "आम्ही काय प्रॉपर्टीवाली माणसं नाही. २००९ साली कष्टाच्या पैशातून घेतलेली ती जागा आहे. एक रुपया जरी गैरव्यवहारातून खात्यात जमा झाला असेल तर माझी सगळी प्रॉपर्टी भाजपाला दान करेन", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

ईडीनं आज संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावर असलेले अलिबागमधील ८ प्लॉट जप्त केले आहेत. तसंच दादर येथील संजय राऊत यांचं राहतं घर देखील जप्त करण्यात आल्याची माहिती स्वत: संजय राऊत यांनी दिली आहे. या कारवाईनंतर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सूडाचं राजकारण कोणत्या पातळीवर गेलंय हे पाहायला मिळतंय असं म्हटलं आहे. 

"आम्ही काही प्रॉपर्टीवाली माणसं नाही. कष्टाच्या पैशातून २००९ साली जागा घेतली होती. ती जागा १ एकर पण नाही. या जागेवर कारवाई करताना कोणतीही माहिती दिली गेली नाही. कोणतीही विचारणा केलेली नाही आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून मला कळतंय की ईडीनं जप्ती आणली आहे. २००९ साली खरेदी केलेल्या जमिनीत आज ईडीला काळंबेरं दिसतंय. आमच्या पत्नी किंवा जवळच्या व्यक्तींकडून घेतलेल्या या छोट्या छोट्या जागा आहेत. राजकीय सूड आणि बदला घेणं कोणत्या थराला गेलंय हे यातून दिसून येतंय", असं संजय राऊत म्हणाले. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी 'असत्यमेव जयते!', असं ट्विट करत कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे.

माझं राहतं घर जप्त केल्यानं भाजपाला आनंदसंजय राऊत यांच्याशी निगडीत दादर येथील एक फ्लॅट देखील जप्त करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यास खुद्द संजय राऊत यांनी दुजोरा देत आपलं राहतं घर जप्त केल्याची माहिती दिली आहे. "आमचं राहतं घर जप्त केलं आहे. मराठी माणसाचं राहतं घर जप्त केलं. भाजपाच्या लोकांना याचा आनंद होतोय. फटाके फोडत आहेत. चांगली गोष्ट आहे. यातून लढण्याची आणखी प्रेरणा मिळते", असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतअंमलबजावणी संचालनालयशिवसेना