Join us  

जमत नाही तर घोषणा कशाला करता? - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 6:53 AM

निवडणुका जवळ आल्या की महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल द्यायची सत्ताधाऱ्यांची सवय आहे. कांदा-टोमॅटोला भाव नाही, दुधाला अनुदान नाही, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना नऊ महिने झाले तरी पेन्शन दिली जात नाही.

मुंबई : निवडणुका जवळ आल्या की महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल द्यायची सत्ताधाऱ्यांची सवय आहे. कांदा-टोमॅटोला भाव नाही, दुधाला अनुदान नाही, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना नऊ महिने झाले तरी पेन्शन दिली जात नाही. पण, याच योजनांच्या जाहिरातींवर हे सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, असा आरोप करतानाच तुम्हाला जमत नाही तर घोषणा कशाला करता, असा सवाल राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केला.राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की, भाजपा सरकार पोकळ घोषणा करण्यात पटाईत आहे. सरकार शासकीय कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करणार की फक्त एप्रिल फूल करणार, असा प्रश्न करतानाच वेतन आयोगाची अंमलबजावणी केल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, असे पवार म्हणाले. सरकारच्या या फसव्या घोषणा आणि चुकीच्या धोरणांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस ‘निर्धार परिवर्तनाचा’ ही मोहीम हाती घेणार आहे, असे पवार यांनी सांगितले. आघाडीबाबत विचारले असता या चर्चेत थोडेसे मागे-पुढे सरकण्याची आमची तयारी आहे. वेळप्रसंगी मित्रपक्षांशी चर्चा करुन मार्ग काढणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.१० जानेवारी रोजी रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेवून ‘निर्धार परिवर्तनाचा’ ही मोहीम सुरू होईल. त्यानंतर महाडच्या चवदार तळयाच्या ठिकाणी या मोहिमेतील पहिली सभा घेतली जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.पवार-पाटीलयांचा लोकल प्रवासअजित पवार आणि जयंत पाटील यांनी आज लोकल ट्रेनने प्रवास केला. एका कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना डोंबिवलीला पोहचायचे होते. नेहमीच्या वाहनांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता लक्षात घेत राष्ट्रवादीची या नेत्यांनी लोकल ट्रेनमधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली असा प्रवास केला. पवार आणि पाटील यांच्यासोबत आमदार शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, प्रकाश गजभिये, माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य नेते उपस्थित होते.

टॅग्स :अजित पवारमहाराष्ट्र