मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीचा फॉर्म्युला ठरवताना जे-जे ठरलंय त्यानुसार करायचे असेल तर फोन करा, मी चर्चेला तयार आहे या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला गुरुवारी सुनावले. शिवसेना आमदारांच्या बैठकीत भावनिक होऊन उद्धव म्हणाले की मी काय चुकलो ते सांगा. शिवसेना कधीही शब्द फिरवत नाही. ती आमची संस्कृती नाही पण मित्र शब्द फिरवणार असेल तर आम्ही ते का सहन करायचे? भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मला शब्द दिला होता. मुख्यमंत्री पदासह सर्व काही निम्मे निम्मे ठरलेले होते मग आता भाजप मागे का जात आहे, असा सवाल त्यांनी केला.
युती मला तोडायची नाही. जे ठरलंय तेवढंच मी मागतोय. त्यापेक्षा अधिक कणभरही मागत नाही मग शब्द फिरवून युती तोडायला कोण निघाले आहे, असा सवाल करून ते म्हणाले की शिवसेना एकसंध आहे, आम्ही आमची ताकद दाखवून देऊ.
मुंबई : सर्वाधिक आमदार असलेला भाजप वेळकाढूपणा करीत असून सत्ता स्थापनेसाठीच्या विलंबास हाच पक्ष जबाबदार आहे असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केला. स्वत:ही सरकार स्थापन करायचे नाही आणि घटनात्मक पेच निर्माण करायचे हे आता चालणार नाही, असा इशारा त्यांनी भाजपला दिला.
ते म्हणाले की, कायदे के दायरे मे रहकर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. राज्यघटना ही तुमची जहागीर नाही. सरकार बनविण्यास असमर्थ आहोत हे भाजपने आधी जाहीर करावे मग शिवसेना पाऊलं उचलेल. राज्याला लवकरच नवे सरकार देईल. आमच्याकडे बहुमताचा आकडा आहे. आमच्याकडे पर्याय आहे, त्या शिवाय आम्ही बोलत नाही. शिवसेना कधीही आशेवर जगत नाही. आत्मविश्वासावर जगते. आमच्या आमदारांच्या निष्ठा आणि लोकांच्या विश्वासावरच आम्ही पुढे जाऊ. मतदारांना शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूपसणाºया लोकांना धडा शिकवायचा आहे, असे राऊत म्हणाले.