Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतून गुजराती, राजस्थानींना काढले तर..; राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या विधानावरून नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 08:19 IST

राज्यपालांच्या विधानावरून काँग्रेस-राष्ट्रवादीने केली टीका

मुंबई - ठाणे, मुंबई या शहरातून गुजराती, राजस्थानींना काढून टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं तेदेखील म्हणता येणार नाही असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले आहे. त्यामुळे राज्यपालांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यपालांच्या विधानावरून विरोधकांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर घणाघात केला आहे. 

याबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे. मिटकरी यांनी ट्विट करत म्हटलंय की, महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसली जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा अशी मागणी त्यांनी केली आहे. 

तर राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

काय म्हणाले राज्यपाल?भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे असे सांगताना त्याग, बलिदान व सेवा यामुळेच जनतेचे प्रेम मिळते आणि म्हणून सर्वांनी समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे, असं राज्यपालांनी सांगितलं. मुंबई आणि  ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. राजस्थानी मारवाडी समाजानं व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालयं, इस्पितळं बांधली व गोरगरिबांची सेवा केली.  राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तिथं तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो, असं राज्यपालांनी म्हटलं.

टॅग्स :भगत सिंह कोश्यारीमुंबईकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस