मुंबई - माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही. माझ्या पोरांची काही चूक नाही. आम्ही २ वर्षापासून आरक्षण मागत आहोत. माझ्या जातीची काही चूक नाही. माझ्या जातीला तुम्ही इतके वेड्यात काढता का? आमचे आरक्षण असूनही दिले जात नाही असं सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलनाच्या एक महिना आधी मी सांगितले होते, देवेंद्र फडणवीसपोलिसांचा वापर कार्यकर्ता म्हणून करतोय. त्यांचे काही लोक आमच्यात घुसवून ते हुल्लडबाजी करणार आणि आमच्या आंदोलकांवर खापर फोडणार. ते आमचे कार्यकर्ते नाहीत. त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस असणार आहे. काही जातीयवादी पोलीस मराठा पोरांना उसकावून आरक्षण असं मिळणार नाही, तुम्ही उड्या हाणा...काही पोलीस गाड्या अडवा, मग आरक्षण मिळेल असं पोरांना सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे नाव सांगून पोलीस वाहने अडवत आहेत, काही रुमाल बांधत आहेत असले प्रकार घडत आहे. त्यामुळे माझ्या एकाही पोराला लागले तर पुन्हा महाराष्ट्र कधीच सुरू होऊ देणार नाही. एकाही पोराला काठी लागली तर मुंबईसह महाराष्ट्र पुन्हा कधी सुरू होऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच देवेंद्र फडणवीसांना पुन्हा सांगतोय, तुमचा एक डीसीपी आहे तो दंगल पेटावी म्हणून आंदोलकांच्या कॉलर धरतोय. पोरांना कॉलर धरल्यावर, ढकलून दिल्यावर राग येतो. उगाच असले प्रकार करू नका. लई पश्चाताप होईल. तो जो कुणी डीसीपी असेल त्याला सांगा. आमच्या जालना येथून पोलीस अधिकारी आलेत, त्यांना पुन्हा गावाला पाठवून द्या. जातीयवादी असणाऱ्यांना पहिले इथून काढून टाका अशी मागणी जरांगे यांनी केली.
...तर देशाला डाग लागेल
दरम्यान, प्रत्येकवेळी तुम्ही बांधलेले अंदाज चुकत आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्याबद्दल आयुष्यात कधीही विचार करू नका. मी विचित्र रसायन आहे. माझा समाज मला आयुष्यात कधीही सोडू शकत नाही, त्यासाठी तो पक्षाला लाथ मारू शकतो. एवढा समाज माझ्यावर प्रेम करतोय. तुमच्या एका चुकीमुळे देशाला डाग लागू शकतो. तुमच्या आडमुठेपणा, बालिशपणामुळे आणि द्वेषाने भरलेल्या बुद्धीमुळे देशाला डाग लागू शकतो. नरेंद्र मोदी, अमित शाह यांना डाग लागू शकतो, तो लागू देऊ नका कारण पुढचा काळ अवघड होईल असा इशाराही जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.
मुंबईत उभं राहायला जागा राहणार नाही
आम्ही ४ महिन्याआधी सरकारला निवेदन दिले होते. सरकारने त्याची दखल घेतली नाही. आंदोलनाविरोधात याचिका केली जाते. ४ महिने सरकारने हालचाल केली नाही. आता सरकारमुळे मुंबईतील शांतता बिघडली आहे असं का म्हटलं जात नाही. सरकारला २ वर्ष दिली आहेत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी मला गोळ्या घातल्या तरी मी इथून उठणार नाही. आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. मुख्यमंत्री जर ऐकत असतील तर तुमच्या हातातील वेळ गेली नाही. महाराष्ट्रातील सर्व मराठा मुंबईच्या दिशेने निघणार आहे. त्याला आणखी काही दिवस आहेत त्याआधी अंमलबजावणी करा. जर ते आले तर मुंबईत कुठेही उभे राहायला जागा राहणार नाही. येणाऱ्यांची संख्या किमान साडे पाच कोटीपेक्षा जास्त असणार आहे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं.
काय आहेत मागण्या?
सातारा गॅझेट, हैदराबाद गॅझेट लागू करायलाच हवेत. बलिदान दिलेल्या कुटुंबाच्या वारसाला नोकरी आणि आर्थिक मदत हवी. मराठा आणि कुणबी एकच आहे तो जीआर मला पाहिजे. मी एकही गोष्ट सोडणार नाही. सरकारने मागण्यांवर बारकाईने पाहिले पाहिजे. सगेसोयरेबाबत अधिसूचना काढणार होते, त्याचे काय झाले तेदेखील कळायला हवे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.