Join us

नैतिकता पाळली असती तर शिवसेना-भाजपचं सरकार असतं, शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 15:48 IST

सत्याचा विजय झाला, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. या देशात घटना आहे, कायदा आहे, नियम आहे, त्याच्या बाहेर कुणालाही जाता येणार नाही हे मी नेहमी सांगतो.

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षावर अखेर १० महिन्यांनी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायालयाच्या निकालात शिंदे गटाला फटकारलं असलं तरी सध्याच्या सरकारला कुठलाही धोका नसल्याचं सिद्ध झालं आहे. तसेच, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर महाविकास आघाडी सरकार परत आणता आलं असतं, असेही न्यायालयाने म्हटले. त्यामुळे, उद्धव ठाकरेंचा राजीनामाच या सरकारला कायम ठेवण्यास कारणीभूत ठरल्याचे अधोरेखित झाले आहे. यावरुन, आता शिंदे आणि ठाकरे आमने-सामने आले आहेत. शिंदे-फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन निकालावर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी, नैतिकतेच्या मुद्द्यावरही भाष्य केले. 

सत्याचा विजय झाला, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. या देशात घटना आहे, कायदा आहे, नियम आहे, त्याच्या बाहेर कुणालाही जाता येणार नाही हे मी नेहमी सांगतो. आम्ही जे सरकार स्थापन केले ते कायद्याच्या चौकटीत बसून केले. त्यावर, आज सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयाच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले. तसेच, नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा मागणाऱ्या उद्धव ठाकरेंवरही पलटवार केला. 

नैतिकतेच्या ज्या गोष्टी सुरु झाल्यात तेव्हा शिवसेना भाजपा युतीला जनतेने बहुमत दिले होते. लोकांना हवे होते ते केले. भाजपासोबत निवडणूक लढविली आणि सत्तेच्या खुर्चीसाठी दुसऱ्यांसोबत गेले, त्यामुळे नैतिकता कोणी जपली हे सांगण्याची गरज नाही. नैतिकता पाळली असती तर आज शिवसेना-भाजपचं सरकार असतं, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. तसेच, धनुष्यबाण वाचविण्याचे काम आम्ही केले, बाळासाहेबांचा पक्ष वाचविला, तुम्ही गहाण ठेवला होता, असा टोलाही शिंदेंनी लगावला. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे

 उद्धव ठाकरे यांनीही शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत राजीनाम्याची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन भाष्य करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. तसेच, मी राजीनामा दिला, कारण गद्दारांच्या समोर बहुमत चाचणी देणं मला मान्य नव्हतं. म्हणून मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. माझ्यावर घराण्याचे झालेले संस्कार किंवा शिकवण महत्त्वाची आहे. त्यामुळेच, मी राजीना दिला, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तसेच, आता, माझ्याप्रमाणेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाउद्धव ठाकरे