Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटीत कर्मचाऱ्यांना रिडींग घेण्यासाठी प्रवेश नाकारला तर पुन्हा सरासरी वीजबिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 17:27 IST

महावितरणच्या ग्राहकांना योग्य वीजवापराचे अचूक वीजबिल देण्यासाठी मीटरचे रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

मुंबई : महावितरणच्या ग्राहकांना योग्य वीजवापराचे अचूक वीजबिल देण्यासाठी मीटरचे रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कोणाच्याही संपर्कात न येता घराबाहेर असलेल्या वीजमीटरचे रिडींग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना वीजग्राहकांनी सहकार्य करावे. दरम्यान, कर्मचाऱ्यांना रिडींग घेण्यासाठी सोसायटीत प्रवेश नाकारला जात असेल तर तेथील वीजग्राहकांना पुन्हा सरासरी वीजबिले जाण्याची शक्यता आहे. तसेच अचूक बिलासाठी पुन्हा पुढील महिन्यातील मीटर रिडींगसाठी प्रतिक्षा करावी लागेल. त्यामुळे मीटर रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागामध्ये आणि कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र (कन्टेंटमेंट एरिआ) वगळून वीजग्राहकांकडील मीटरचे रिडींग घेण्यात येत आहे. संबंधीत एजन्सीजच्या कर्मचाऱ्यांनी मीटर रिडींग घेताना हॅण्डग्लोव्हज, मास्क, सॅनिटाजर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा रिडींग घेताना कोणाशीही संपर्क येत नाही. सर्व मीटर ग्राहकांच्या घराबाहेर असल्याने तसेच अपार्टमेंटमध्ये वीज मीटरची तळमजल्यावर स्वतंत्र खोली असल्याने रिडींगसाठी घरात किंवा इमारतीमध्ये जाण्याची गरज नाही. मीटर रिडींगची प्रक्रिया महावितरणच्या मोबाईल अँपद्वारे होत आहे. मोबाईलद्वारे एका मीटर रिडींगचा फोटो काढणे व रिडींग घेणे यासाठी केवळ ८ ते १० सेकंदाचा कालावधी लागतो. मीटर रिडींग घेणारे कर्मचारी हे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्यविषयक दक्षता घेऊनच मीटर रिडींग घेत आहेत. एकच कर्मचारी कोणाच्याही संपर्कात न येता रिडींग घेत आहे.................................- लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडींग घेण्याचे काम तात्पुरते थांबविण्यात आले होते.- लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडींग उपलब्ध होऊ न शकल्याने वीजग्राहकांना त्यांच्या वीजवापरानुसार सरासरी वीजबिल देण्यात आले.- आता जूनमध्ये घेतलेल्या प्रत्यक्ष रिडींगद्वारे गेल्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमधील अचूक वीजवापरानुसार वीजबिल दुरुस्त करण्यात येत आहे.

 

टॅग्स :लॉकडाऊन अनलॉककोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस