बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 06:44 IST2026-01-12T06:44:16+5:302026-01-12T06:44:35+5:30
मराठी माणसांसाठी आम्ही दोन भाऊ एकत्र आलो आहोत...

बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी दादरच्या ऐतिहासिक शिवतीर्थावर 'शिवशक्ती'चा महासंग्राम पाहायला मिळाला. आज या क्षणाला आम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे असायला हवे होते. त्यांना आनंद झाला असता. मुंबईवर आलेले संकट दूर करण्यासाठी आम्ही दोन भाऊ एकत्र आलो आहोत, असे भावनिक आवाहन करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपच्या 'मुंबई तोडण्याच्या' कथित डावावर जोरदार तोफ डागली.
मुंबईत शिवाजी पार्कवर उद्धवसेना-मनसे- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाची संयुक्त प्रचारसभा झाली. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपच्या अलीकडच्या काळातील युती आणि उमेदवारीवरून त्या पक्षाचे कठोर शब्दांत वाभाडे काढले.
अकोटमध्ये एमआयएम आणि बदलापुरात काँग्रेससोबत युती करणाऱ्या भाजपला नीतिमत्ता उरली आहे का? तुळजापूरच्या ड्रग्ज आरोपीला तिकीट आणि बदलापूर प्रकरणातील सह-आरोप्यास नगरसेवक करण्याची हिंमत येते कुठून? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे, त्यावरून जनतेने सावध होण्याची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
जमीन हीच खरी संपत्ती आहे, ती गेली की तुमचे अस्तित्व संपेल, असे सांगत राज ठाकरेंनी सर्व पक्षांतील मराठी माणसांना आवाहन केले की, पक्षभेद विसरून महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी एकत्र या. मराठी माणसाला एकटे पाडण्याचा डाव आहे, पण आपण एकटेही बास आहोत. जो लढा मराठा साम्राज्याने दिला, तोच लढा आता महाराष्ट्र वाचवण्यासाठी द्यावा लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.
'त्यांची' दिलगिरी व्यक्त करतो : राज ठाकरे
२० वर्षांनी युती केल्यामुळे काहींना उमेदवारी मिळाली, काहींना नाही. त्यामुळे काही जण नाराज झाले. काही सोडून गेले. सर्वांचे समाधान करणे शक्य नाही. ते आपलेच आहेत, परत येतील. आता आहेत ते जातील, गेलेले तर परत येतीलच, असे म्हणत राज यांनी नाराज मनसैनिकांची दिलगिरी व्यक्त करत मनधरणी केली.
मराठी माणसाला दुहीचा शाप
उद्धव ठाकरे मराठी माणसाला दुहीचा शाप आहे. शिवरायांच्या साक्षीने या दुहीला गाडण्याची शपथ आपण घेतली पाहिजे. औरंगजेबाचे एक वाक्य आहे, या पहाडी मुलखात पराक्रम शिकवावा लागत नाही, हे मरहट्टे पराक्रमी आहेत. पण इथे दुहीचे बीज भिरकावले तर एवढे रुजते की तमाम दौलत तबाह करून टाकते, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
दोन भाऊ माझ्यामुळे एकत्र आले असतील तर बाळासाहेबांचे मला आशीर्वाद मिळतील
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासावर नेमके काय बोलले हे दाखवावे, आपण त्यासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यावर पलटवार करत फडणवीस यांनी रविवारी प्रत्युत्तर दिले. आम्ही ९५ टक्के विकासावरच बोलतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच एक लाख रुपये आमच्याकडे पाठवून द्यावे, ते मी लाडक्या बहिणींना देईन, असे प्रतिआव्हान दिले.
मी आतापर्यंत संयम पाळलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय, कदाचित निवडणुकीतील स्थिती पाहून दादांचा संयम कमी झालेला वाटतोय, असे ते पुण्यातील प्रकट मुलाखतीवेळी म्हणाले.
कोणताही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंद आहे. राज ठाकरेंनी मला क्रेडिट दिलं याचा आनंद वाटतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं ते दोघे मिळेल. एकत्र येत असतील तर त्याचा आनंद मला आहे, त्यांचा मला आशीर्वाद मिळेल.