Join us  

"मराठ्यांवर कारवाया झाल्या तर..."; जरांगेचं पुन्हा एकदा अजित पवारांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 9:45 PM

मराठा आरक्षणासाठी काही जण टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईत येण्याच्या घोषणा देत आहेत

मुंबई - मराठा आरक्षणासाठीची धुरा सांभाळणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर प्रत्युत्तर दिलं होतं. मराठा आरक्षणावर बोलणाऱ्यांविरुद्ध ते नेहमीच आक्रमक भूमिका घेतात. नुकतेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील मोर्चाला अनुसरुन एक विधान केलं होत. त्यावरुन, जरांगे पाटील यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. आज पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांवर भाष्य करताना, तुम्हाला किती ज्ञान आहे, हे सर्वांना माहिती आहे. पण, आमच्या आरक्षणाविरुद्ध कोणी बोललं तर, आम्ही त्याला सोडणार नाही, असे म्हणत जरांगे पाटलांनी अजित पवारांवर निशाणा साधला. 

मराठा आरक्षणासाठी काही जण टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईत येण्याच्या घोषणा देत आहेत. जर कोणी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कुणाचीही गय केली जाणार नाही. कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही हे लक्षात ठेवावे, असा इशाराच मनोज जरांगे-पाटील यांचे नाव न घेता अजित पवारांनी दिला होता. अजित पवारांच्या विधानावर जरांगे पाटील यांनीही पलटवार केला होता. तुम्हीच छगन भुजबळांना मराठ्यांच्या अंगावर सोडले. हे कालपासून तुमच्या बोलण्यातून सिद्ध व्हायला लागले. भुजबळच्या खांद्यावर हात टाकून हिंडा. मराठे तुमचा वेळेवर हिशोब करतील असे जरांगे यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता पुन्हा एकदा जरांगेंनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.  

अजित पवारांनी मुंबईत येऊन कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणार असा इशारा दिला आहे, त्यासंदर्भात जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, आम्हाला सगळं समजलं, मला समजून काय उपयोग आहे. सगळ्या मराठ्यांना समजलंय. पुन्हा एकदा मराठ्यांचे हाल करायचे. पुन्हा एकदा मराठ्यांचे नुकसान करायचे, याच्याआधी एकदा केलं. आता, पुन्हा करायचंय, असाच अर्थ अजित पवारांच्या वाक्यातून दिसून येतोय, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. तसेच, अजित पवारांवर जास्त बोलत नाही. पण, यापुढे कारवाया झाल्या तर, त्यांनीच करायला लावल्या, असं मराठे ग्राह्य धरणार आहेत. त्यांना परत सांगू, अशा शब्दात अजित पवारांनी दिलेल्या इशाऱ्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. 

मराठा आरक्षण हे आमच्या पोरांसाठी जीव का प्राण आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणाच्या विरोधात आलेल्यांना आपण नाही सोडत, मग ते मराठ्यांचा असो किंवा आणखी कोणाचा. तुमचं ज्ञान महाराष्ट्राला माहिती आहे, तुमच्यावर तुम्ही ग्रंथ का लिहिनात, मला काय करायचं. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका, तुमचं-आमचं काय वैर आहे का, असेही जरांगे यांनी म्हटले. तसेच, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर मी कोणालाच सोडत नाही, मी माझ्या परिवाराला सोडत नाही, असा इशाराही एकप्रकारे जरांगे पाटील यांनी म्हटलं.  

काय म्हणाले होते अजित पवार

मराठा आरक्षणासाठी काही जण टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईत येण्याच्या घोषणा देत आहेत. जर कोणी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कुणाचीही गय केली जाणार नाही. कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही हे लक्षात ठेवावे. महाराष्ट्रात सर्व जातीधर्माची परंपरा आहे. सर्वांनीच सर्व जातीधर्माच्या श्रद्धास्थानांचा आदर केला पाहिजे. शाहू, फुले ,आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा हाच विचार असून, तोच पुढे नेण्याचे काम आपण केले पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले होते. तर, वाचाळवीरांची संख्या जास्त आहे. विकासावर ते काहीच बोलत नाहीत, अशी टीकाही पवारांनी केली होती.

टॅग्स :अजित पवारमराठा आरक्षणमनोज जरांगे-पाटीलमराठा