"स्पीड बोट धकडल्यानंतर डेकवर गेलो अन्..."; अपघातात बचावलेल्याने सांगितली भयानक कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 08:48 IST2024-12-19T08:45:14+5:302024-12-19T08:48:49+5:30
मुंबई बोट दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशाने बोटीवर नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे.

"स्पीड बोट धकडल्यानंतर डेकवर गेलो अन्..."; अपघातात बचावलेल्याने सांगितली भयानक कहाणी
Mumbai Ferry Boat Accident : मुंबईत नौदलाच्या स्पीड बोटची प्रवासी बोटीला धडक बसून मोठा अपघात झाला. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला, तर १०१ जणांना वाचवण्यात यश आले. ही बोट प्रवाशांसह गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा बेटावर जात होती. नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी चारच्या सुमारास इंजिन चाचणीदरम्यान नौदलाच्या स्पीड बोटचे नियंत्रण सुटले आणि ती नीलकमल या प्रवासी बोटीला धडकली. मुंबई बोट दुर्घटनेतून बचावलेले ४५ वर्षीय गणेश यांनी सांगितले की, ते डेकवर उभे होते तेव्हा या बोटीच्या दिशेने वेगात येत असलेली स्पीड बोट सारखी बोट पाहिली तेव्हा त्याच्या मनात विचार आला की काहीतरी अप्रिय घटना घडू शकते.
या अपघाताबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. "बुधवारी दुपारी ३.५५ च्या सुमारास नीलकमल नावाच्या बोटीला अपघात झाला. या दुर्घटनेत १०१ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १० नागरिक आणि ३ नौदलाचे जवान आहेत. दोन जण गंभीर जखमी असून, त्यांना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नौदल, तटरक्षक दल आणि पोलिसांनी ११ क्राफ्ट आणि ४ हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य हाती घेतले आहे. बेपत्ता लोकांची अंतिम माहिती गुरुवारी सकाळी मिळणार आहे. शोकग्रस्त कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची सानुग्रह रक्कम दिली जाईल. या संपूर्ण घटनेची पोलीस आणि नौदल चौकशी करणार आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"बोटीवर मुलांसह १०० हून अधिक प्रवासी होते. दुपारी ३.३० वाजता तिकीट काढल्यानंतर मी बोटीत चढलो आणि डेकवर गेलो. नीलकमल बोट मुंबईच्या किनाऱ्यापासून ८ ते १० किमी अंतरावर होती. मी पाहिले की स्पीड बोट पूर्ण वेगाने फिरत होती. स्पीड बोट आमच्या बोटीला धडकताच समुद्राचे पाणी आमच्या बोटीत येऊ लागले, त्यानंतर बोट उलटू लागल्याने बोटीच्या कॅप्टनने प्रवाशांना लाईफ जॅकेट घालण्यास सांगितले. आमच्या बोटीवर असलेल्या एका नौदल कर्मचाऱ्याचा या अपघातात पाय कापल्यामुळे त्याचा मृत्यू झाला," असं गणेश यांनी सांगितले.
"मी लाइफ जॅकेट घेतले, वर गेलो आणि समुद्रात उडी मारली. मी १५ मिनिटे पोहत होतो तेव्हा बचाव पथकाने मला वाचवले आणि इतर लोकांसह गेटवे ऑफ इंडियावर आणले. नौदल, तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांचे बचाव पथक अपघातानंतर अर्ध्या तासात बोटीपर्यंत पोहोचले होते. सुटका करण्यात आलेल्या १० प्रवाशांच्या पहिल्या गटात मी होतो," असंही गणेश म्हणाले
दरम्यान, बंगळुरूमधील विनायक माथम नावाच्या आणखी एका वाचलेल्या व्यक्तीने सांगितले की, "मी आपल्या दोन सहकाऱ्यांसह नीलकमल या बोटीवर होता. सुरुवातीला मला वाटले की नौदलाचे क्राफ्टचे कर्मचारी मनोरंजनासाठी बाहेर पडले आहेत. कारण त्यांची बोट आमच्या बोटीभोवती फिरत होती. आमच्या बोटीत पुरेसे लाईफ जॅकेट नव्हते."