महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने आता मराठी विरुद्ध अमराठी असं रूप घेतलं आहे. त्यातच मराठीत न बोलल्याने मीरारोड येथे एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. त्या पार्श्वभूमीवर आता एक प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमींना डिवचणारं विधान केलं आहे. मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा, असे केडिया यांनी एक्सवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये राज ठाकरे यांना टॅग करत म्हटले आहे.
एक्सवरील आपल्या अकाउंटवरून राज ठाकरे यांना टॅग करत सुशील केडिया यांनी लिहिले की, गेली ३० वर्षे मुंबईत राहिल्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तसेच तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात ते पाहता जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोला? असं आव्हान सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे.
काही दिवसांपूर्वी मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मीरारोडमध्ये एका दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार दिल्याने त्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता सुशील केडिया यांची राज ठाकरे यांना आव्हान देणारी ही पोस्ट समोर आली आहे. आता मनसेकडून त्यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.