Join us  

जातीनिहाय जनगणनेसाठी सर्वपक्षीय बैठक घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंती करणार - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 2:31 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंत्री, खासदार व प्रमुख नेत्यांची आढावा बैठक घेतली. यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक असून राष्ट्रवादीची मागणी आहेच, शिवाय तशी भूमिकाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पक्षाच्यावतीने सर्वपक्षीय बैठक घेण्याची विनंती करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंत्री, खासदार व प्रमुख नेत्यांची आढावा बैठक घेतली. यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

शरद पवार हे अधूनमधून अशा बैठका घेऊन राज्यातील प्रश्नांवर चर्चा करत असतात. राज्यातील सर्व प्रश्नावर या बैठकीत चर्चा झाली. यामध्ये राज्यसभेची निवडणूक, विधानपरिषद,आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावरही चर्चा झाली, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे सर्व मंत्री हे जनता दरबार पक्षाच्या मुख्य कार्यालयात घेत आहेतच. लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम मोठ्याप्रमाणात सुरू आहेत. जिल्ह्याजिल्ह्यात जाऊनही जनतेचे प्रश्न सोडवले जात आहेत असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

भाजपने राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. भाजपला तो घोडेबाजार अपेक्षित नसावा, अशी खात्री आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ते निर्णय घेतील अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

तिन्ही पक्षाची महाविकास आघाडी आहे, त्यामुळे एकत्र निवडणूका लढणार आहोत. मतदान १० जूनला आहे. त्यामुळे बराच वेळ आहे, असे सूचक वक्तव्य जयंत पाटील यांनी केले.

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसनॅशनल काँग्रेस पार्टीशरद पवार