Join us
Daily Top 2Weekly Top 5

Anil Deshmukh: '...तेव्हा मी स्वत: ईडीच्या समोर जाणार'; अनिल देशमुखांनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 16:41 IST

Anil Deshmukh:अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका होत असताना आता स्वत: अनिल देशमुखांनी एक पत्रक काढून भूमिका स्पष्ट केली आहे. 

Anil Deshmukh: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याबाबत चौकशीला हजर न राहण्याचे धोरण कायम ठेवले आहे. यावरुन अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका होत असताना आता स्वत: अनिल देशमुखांनी एक पत्रक काढून भूमिका स्पष्ट केली आहे. 

"माझी ईडीच्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयानं स्विकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा पण दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी स्वत: ईडीच्या समोर जाणार आहे व त्यांना संपूर्ण सहकार्य करणार आहे. माझ्या संपूर्ण राजकीय-सामाजिक जीवनात मी सदैव उच्च आदर्शाचे पालन केले आहे", असं अनिल देशमुख यांनी पत्रकात म्हटलं आहे. 

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर चौकशीला पाचारण करण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्यावर ईडीचे अधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईला तातडीने स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर ईडीने मंगळवारी दोघांना नव्याने समन्स जारी केला होता. देशमुख यांना पाचव्यावेळी तर ऋषीकेश यांना दुसऱ्यांदा नोटीस काढून बुधवारी सकाळी अकरा वाजता बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात हजर राहण्यास कळविले होते. मात्र, आजही ते हजर झाले नाहीत. त्यांचे वकील ॲड. इंद्रपाल सिंग यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटून पत्र दिले.

टॅग्स :अनिल देशमुखअंमलबजावणी संचालनालय