'मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती, पण...'; प्रताप सरनाईकांनी दिली प्रतिक्रिया

By मुकेश चव्हाण | Published: November 24, 2020 01:04 PM2020-11-24T13:04:54+5:302020-11-24T13:05:10+5:30

सध्या प्रताप सरनाईक परदेशात असून त्यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे.

I was not given any notice from the ED; said shivsena leader Pratap Sarnaik | 'मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती, पण...'; प्रताप सरनाईकांनी दिली प्रतिक्रिया

'मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती, पण...'; प्रताप सरनाईकांनी दिली प्रतिक्रिया

Next

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) अधिकारी पोहोचले आहेत. तसेच प्रताप सरनाईकांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचं पथक दाखल झालं आहे. त्यांच्या कार्यालयांमध्येही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. सध्या प्रताप सरनाईक परदेशात असून त्यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे.

प्रताप सरनाईक मराठी वृत्तावाहिनीशी संवाद साधताना म्हणाले की, ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली आहे. मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. पण तरीही छापा टाकण्यात आला आहे, असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

आज सकाळी आठ-साठे आठच्या सुमारास ईडीची तीन पथकं तपासासाठी पोहोचली. त्यांनी आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे दोन पुत्र आणि त्यांच्या कार्यालयात तपास सुरू केला. ईडी नेमक्या कोणत्या प्रकरणात तपास करत आहे, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या सरनाईक पिता पुत्र देशाबाहेर असल्याचं समजतं. सरनाईक यांच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना ईडीनं बोलावलं आहे. शिवसेनेच्या इतर काही नेत्यांनादेखील ईडीकडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचं समजतं आहे.

दरम्यान, प्रताप सरनाईक यांच्या घरी, कार्यालयात ईडीचे अधिकारी पोहोचल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. 'मनी लॉण्ड्रिंगसारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहेत. त्यांचे मुखिया यामध्ये अग्रेसर आहेत. त्यामुळे मला याबद्दल कोणतंही आश्चर्य वाटत नाही. मुंबई महापालिकेत माफिया राज असल्याचा आरोप मी आधीही केला आहे. पालिकेतून कंत्राट, भागिदारीतून प्रचंड पैसा येत असतो,' याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

या प्रकरणी अद्याप शिवसेनेकडून कोणत्याही नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र शिवसेना नेते थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार असल्याचं समजतं. मात्र ही कारवाई राजकीय स्वरूपची असून ती सूडबुद्धीनं सुरू असल्याचा सूर पक्षात आहे. अर्णब गोस्वामी, कंगना राणौत प्रकरणात सरनाईक यांनी अतिशय आक्रमकपणे पक्षाची बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याची चर्चा शिवसेनेत आहे.

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार- शिवेसनेचे नेते संजय राऊत

प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. कितीही दबाव आणला तरी महाविकास आाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. मात्र अशा कारवाया करून पुढची २५ वर्षे भाजपाचे महाराष्ट्रात सरकार येणार नाही. तसेच सरकारी संस्थांनी राजकीय शाखा असल्यासारखे वागू नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.

चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चूक असेल तर एजन्सी कारवाई करेल, चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी राज्य सरकारनं ईडीची वाट न पाहता त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी, असं आव्हान दिलं आहे. 

Web Title: I was not given any notice from the ED; said shivsena leader Pratap Sarnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.