ठगालाच सांगितले, माझी फसवणूक झाली आहे... दुसऱ्या व्यवहारात आरोपी फिल्मी स्टाईलने जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 09:33 IST2025-07-03T09:33:30+5:302025-07-03T09:33:56+5:30
ट्रॅव्हल व्यवसाय करणाऱ्या पुण्यातील ३८ वर्षीय युट्युबर महिलेने जानेवारी २०२४ मध्ये फेसबुकवर पाच लाख गुंतवून २५ लाख कमावण्याच्या जाहिरातीतील मोबाईलवर संपर्क केला.

ठगालाच सांगितले, माझी फसवणूक झाली आहे... दुसऱ्या व्यवहारात आरोपी फिल्मी स्टाईलने जाळ्यात
मनिषा म्हात्रे
मुंबई : ‘पाच लाख गुंतवा आणि २५ लाख मिळवा’ अशा सोशल मीडियावरील आमिषाच्या जाळ्यात पुण्याची तरुणी सापडली. गुंतवलेले पैसे घेऊन ठग पसार झाला आणि वर्षभर त्याचा थांगपत्ता लागला नाही. मात्र, वर्षभराने गुजरातमध्ये फिरायला गेलेल्या या तरुणीला त्या ठगाची भाषा आणि शैली पुन्हा एकदा ऐकू आली. तिने चौकशी करत टोळीतील सदस्यालाच फसवणुकीची कहाणी सांगितली आणि सुरू झाला थरारक पाठलाग. अखेर सायन येथे हा ठग रंगेहात पकडला गेला. सायन पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ट्रॅव्हल व्यवसाय करणाऱ्या पुण्यातील ३८ वर्षीय युट्युबर महिलेने जानेवारी २०२४ मध्ये फेसबुकवर पाच लाख गुंतवून २५ लाख कमावण्याच्या जाहिरातीतील मोबाईलवर संपर्क केला. तेव्हा, तिला पैसे मुंबईत येऊनच द्यावे लागतील, असे सांगण्यात आले. मार्च २०२४ मध्ये तिला दादर परिसरात ठरलेल्या ठिकाणी एक व्यक्ती भेटली. त्याला ५ लाख रुपये दिल्यानंतर, तो ‘२५ लाख घेऊन येतो’ असे सांगून गेला तो परतलाच नाही. काही वेळात त्याचा मोबाइलही बंद झाला. तेव्हा तिला रिकाम्या हाताने पुण्याला परतावे लागले.
मार्च २०२५ मध्ये ही तरुणी कच्छ (गुजरात)ला पर्यटनासाठी गेली असताना, ट्रॅव्हल चालकाच्या भाषेत तिला ठगाची भाषा जाणवली. त्याने स्वतःचे नाव लाखा पटेल असल्याचे सांगितले. तिने आपली फसवणुकीची कहाणी त्याला सांगताच, त्याने कच्छमधील अशी फसवणूक करणाऱ्या कार्तिक नावाच्या व्यक्तीचा मदतीसाठी मोबाइल क्रमांक तिला दिला. कार्तिकशी संपर्क साधल्यावर त्याने फसवणूक करणारा आमचाच सदस्य असल्याचे सांगितले. पैसे परत मिळतील, पण त्यासाठी आणखी दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. जूनमध्ये तिने पैसे देण्याची तयारी दर्शवली. मनसे कार्यकर्ता असलेल्या मित्राला ही माहिती देऊन तिने लक्ष ठेवण्यास सांगितले.
दिल्या जाणाऱ्या नोटा नकली वाटल्याने रोखले!
कार्तिकच्या सांगण्यानुसार, पुढे सिद्धार्थ आणि त्यानंतर सिकंदर नावाच्या व्यक्तींशी संपर्क झाला. सिकंदरने तिला पुन्हा मुंबईत येण्यास सांगितले. ३० जून रोजी तिने मुंबई गाठली. सिकंदरने तिच्याकडून पैसे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वेळी तरुणी सजग होती. दिले जाणारे पैसे नकली वाटल्यामुळे तिने व्यवहार थांबवला. त्याचवेळी मनसे कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
तिला दिलेल्या पाच लाखांच्या बंडलमध्ये नकली नोटा होत्या. याप्रकरणी सायन पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास करत आहे. अशाच प्रकारे काळाचौकी परिसरातही फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातही याच टोळीचा सहभाग आहे का? याबाबत पोलिस तपास करत आहे.