Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यास सोडून मी सर्व विषयांत पारंगत; शरद पवारांनी सांगितलं कॉलेजमधलं गुपित  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 15:30 IST

Sharad Pawar: या पन्नास वर्षांच्या काळात अनेक गोष्टी होऊन गेल्या. कधी सत्तेत, कधी विरोधक म्हणून अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मला मिळाली.

ठळक मुद्देशैक्षणिक दृष्टीने पीएचडी प्रश्न महत्त्वाचा आहेवर्ष वाया जाऊ नये याला प्राधान्य दिलं पाहिजे. कधी सत्तेत, कधी विरोधक म्हणून अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मिळाली

मुंबई - माझं वय ८० वर्षांचं तरी विचार करण्याची प्रक्रिया ८० वर्षांपर्यंत गेली नाही. ५२ वर्षांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेत वयाच्या २६व्या वर्षी प्रथम निवडून आलो. माझ्यावर पीएचडी करायला चंद्रकांत पाटलांना १० ते १२ वर्ष लागतील असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आयोजित केलेल्या संवाद साहेबांशी या कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, मुंबईतर्फे युवा संवादाचा आगळा-वेगळा कार्यक्रम झाला. मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे. तुमची पिढी आणि माझ्या पिढीत किती अंतर वाढलंय? यातून  मला जाणून घ्यायचं आहे असं त्यांनी सांगितलं. मी २६ व्या वर्षी निवडून आलो होतो. हे सांगायचं कारण केवळ हेच आहे की २६व्या वर्षी देखील आपण विधानसभेत निवडून येऊ शकतो हा पर्याय तुम्हाला कळायला हवा असं त्यांनी सांगितले. 

तसेच या पन्नास वर्षांच्या काळात अनेक गोष्टी होऊन गेल्या. कधी सत्तेत, कधी विरोधक म्हणून अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मला मिळाली. या काळात नव्या पिढीशी संवाद साधण्याची संधी मिळाली की अधिक उत्साहाने काम करण्याची भावना तयार व्हायची. महाविद्यालयीन निवडणुका व्हायला हव्या, अभ्यास सोडून मी सर्व विषयांत पारंगत होतो असं शरद पवार म्हटले.

 

युवकांना देशाच्या प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. शैक्षणिक दृष्टीने पीएचडी प्रश्न महत्त्वाचा आहे. राज्य सरकारने ती गांभीर्याने घ्यायला हवी. वर्ष वाया जाऊ नये याला प्राधान्य दिलं पाहिजे. मी कॉलेजमध्ये असताना दिवसात अभ्यास सोडून सगळ्यात भाग घ्यायचो, महाविद्यालयीन निवडणुका कशा जिंकायच्या यावर विचार करायचो. मी २२ फेब्रुवारीला पहिली निवडणूक जिंकली होती. चढत्या क्रमाने वर जाताना यशस्वी झाला तरी पाय जमिनीवर ठेवावे. कधीही नाउमेद व्हायचं नाही असा सल्ला शरद पवारांनी विद्यार्थ्यांना दिला. 

 

 

टॅग्स :शरद पवारचंद्रकांत पाटीलविद्यार्थीराष्ट्रवादी काँग्रेस