मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 06:46 IST2026-01-02T06:35:41+5:302026-01-02T06:46:04+5:30
उत्तर भारतीय मोर्चाने मीरा–भाईंदरला आयोजित केलेल्या एका संमेलनात कृपाशंकर यांनी, मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होईल, असे वक्तव्य केले होते.

मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
मुंबई : ‘इतके नगरसेवक निवडून आणू, की मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होईल’, या भाजपनेते कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यावरून वाद उफाळल्यानंतर त्यांनी गुरुवारी आपल्या भूमिकेपासून माघार घेतली. “आपण मराठीचा आदर करतो आणि मुंबईचा महापौर महायुतीचा आणि मराठीच होईल”, असे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर भारतीय मोर्चाने मीरा–भाईंदरला आयोजित केलेल्या एका संमेलनात कृपाशंकर यांनी, मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होईल, असे वक्तव्य केले होते.
ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्याबाबत सिंह म्हणाले, “सात-आठ दिवसांपूर्वीच्या कार्यक्रमातील आपले वक्तव्य जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीने व्हायरल केले जात आहे. मला मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पूर्ण आदर आहे.” आमची परीक्षा घेऊ नका. माझ्या वक्तव्यावरून उगाचच मराठी-अमराठी वाद पेटवला जात असून, तो पूर्णपणे निरर्थक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘आम्ही महाराष्ट्रीयनच’
आम्ही स्वतःला महाराष्ट्रीयनच समजतो. उद्या वेळ आली तर महाराष्ट्राच्या रक्षणासाठी सीमेवर पुढे उभे राहू. आमच्या निष्ठेबाबत शंका उपस्थित करू नये, असे आवाहनही सिंह यांनी केले. मुंबईचा महापौर मराठीच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जनता विकासकामांसाठी मतदान करणार आहे. त्यामुळे उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये.
- कृपाशंकर सिंह, भाजप
कृपाशंकर सिंह यांचे उत्तर भारतीय महापौराबाबतचे वक्तव्य अनावधानाने झालेले नाही, तर तो भाजपचाच अजेंडा आहे. वातावरण निर्माण करण्यासाठी भाजपने कृपाशंकर यांची नेमणूक केली आहे. ते भाजपचा बोलका पोपट आहे.
खा. संजय राऊत, उद्धवसेना
कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याची जेवढी मिरची उद्धवसेनेला लागली तेवढी एमआयएमच्या व्यक्तव्याची का लागली नाही? हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी राऊत यांनी घेतलेली दिसते. मुंबईचा महापौर मराठी हिंदूच होणार आणि तो आमचाच होणार. नितेश राणे, भाजप