अजूनही मी उद्धव ठाकरेंच्याच पक्षात, भाजपमध्ये जाण्याबाबत निर्णय नाही: तेजस्वी घोसाळकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 05:18 IST2025-05-15T05:17:30+5:302025-05-15T05:18:46+5:30
उत्तर मुंबईच्या महिला विभाग संघटक तेजस्वी घोसाळकर यांनी मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

अजूनही मी उद्धव ठाकरेंच्याच पक्षात, भाजपमध्ये जाण्याबाबत निर्णय नाही: तेजस्वी घोसाळकर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भाजपमध्ये जाण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. अजूनही आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असून गद्दारी केलेली नाही. पक्षातील पदांचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भेटायला बोलावले होते. त्यानुसार त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्यासमोर ज्या समस्या मांडल्या त्यावर उत्तर मिळाल्यास पुढचा निर्णय लवकर घेईन, असे उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी स्पष्ट केले.
उत्तर मुंबईच्या महिला विभाग संघटक तेजस्वी घोसाळकर यांनी सोमवारी उद्धवसेनेतील पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी बुधवारी मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विभागप्रमुख, विभाग संघटक यांना काही समस्यांबाबत पत्र दिले होते. त्याचा विचार होण्याची आवश्यकता होती. पण त्या झाल्या नसल्यामुळे इथे यावे लागले. अजूनही अन्य कुठल्या पक्षात जाण्याचा विचार केलेला नाही. सर्व परिस्थितीचा विचार करून पुढील निर्णय घेईन, असे त्यांनी सांगितले.